
नांदेड, 18 जानेवारी (हिं.स.)
नांदेड नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेची निवडणुक झाली. या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये नियुक्त केलेल्या पीआरओ, एमपीओ, ओपी आदी ९४ कर्मचाऱ्यांनी निवडणुकीच्या कर्तव्यात कसूर करुन कामाला दांडी मारली आहे. या बाबीची गंभीर दखल निवडणुक विभागाचे नियंत्रक तथा अतिरिक्त आयुक्त यांनी घेतली असून त्यांना नोटीसा बजाविल्या आहेत. भारतीय दंड संहिता कलम १८८ व लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १५१ मधील तरतूदीनुसार फौजदारी कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, अशी नोटीसमध्ये नोंद आहे.
नांदेड महापालिकेच्या २० प्रभागातून ८१ सदस्य निवडण्यासाठी मतदान झाले आहे. ६०० मतदान केंद्रांवर निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी
पीआरओ, एमपीओ, ओपी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. निवडणुकीचे साहित्य व इव्हीएम मशीन घेण्यासाठी शासकीय तंत्र निकेतन महाविद्यालय येथे हजर राहण्याचे आदेश काढण्यात आले होते. साहित्य घेण्यासाठी ९४ जणांनी दांडी मारून निवडणुकीच्या कामात आणि कर्तव्यात निष्काळजीपणा करून टाळाटाळ केली.
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या निवडणुक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ३ हजार ४०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती तर ७० क्षेत्रिय अधिकाऱ्यांना देखील नेमण्यात आले होते. निवडणुक मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयामध्ये हजर राहण्याचे आदेश बजाविले होते त्या आदेशाचे उल्लंघन करुन ९४ जण गैरहजर राहीले आहेत. त्यामुळे निवडणुक कामाच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण झाल्यामुळे त्यांना जबाबदार धरण्यात आले असून त्यांच्यावर कार्यवाही करण्यासाठी महापालिका प्रशासन अॅक्शन मोडवर आहे.
आयुक्तांनी गंभीर दखल घेऊन ९४ जणांना नोटीसा बजाविल्या आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis