पुणे–सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, पाच जणांचा जागीच मृत्यू
सोलापूर, 18 जानेवारी (हिं.स.)। पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे देवडी पाटी येथे शनिवारी (दि. 17) रात्री साडेअकराच्या सुमारास घडलेल्या भीषण अपघाताने परिसर हादरून गेला. या दुर्घटनेत पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू
अपघात लोगो


सोलापूर, 18 जानेवारी (हिं.स.)।

पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे देवडी पाटी येथे शनिवारी (दि. 17) रात्री साडेअकराच्या सुमारास घडलेल्या भीषण अपघाताने परिसर हादरून गेला. या दुर्घटनेत पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून एक महिला गंभीर जखमी झाली आहे.

पनवेल येथून अक्कलकोट येथे देवदर्शनासाठी निघालेली एरटीका कार (MH-46 Z-4536) चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जोरात आदळली. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की वाहनाचा चक्काचूर झाला.

या कारमध्ये तीन पुरुष व तीन महिला असे सहा प्रवासी प्रवास करीत होते. हे सर्व प्रवासी परस्पर मित्र असल्याची माहिती समोर आली आहे. अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.

अपघातात ज्योती जयदास टाकले (रा. सेक्टर ७, पनवेल, जि. रायगड) या महिला जखमी झाल्या असून त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय, मोहोळ येथे दाखल करण्यात आले आहे. उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

अपघाताची माहिती मिळताच मोहोळ पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अपघातानंतर मृतदेह वाहनामध्ये अडकलेल्या अवस्थेत आढळून आले. सदर वाहन रस्त्यापासून सुमारे १० ते १५ फूट अंतरावर झुडपांमध्ये फेकले गेले होते, यावरून अपघाताची तीव्रता स्पष्ट होते.

दरम्यान, मृत व जखमी व्यक्तींची सविस्तर माहिती तसेच अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम पोलीस प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरू आहे. या भीषण घटनेमुळे महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande