
* युवा उद्यमींशी संवाद
छत्रपती संभाजीनगर, 18 जानेवारी (हिं.स.)।
तंत्रज्ञान ही अपरिहार्य गोष्ट आहे. स्वदेशीचा वापर म्हणजे तंत्रज्ञान नाकारणे असे नाही. परंतु आपण तंत्रज्ञानाचे गुलाम होता कामा नये. आपण उद्योग केवळ आपल्या नफ्यासाठी नाही, समाजाच्या भल्यासाठी करतो, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. ते युवा उद्यमी संवाद कार्यक्रमात बोलत होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित सरसंघचालकांनी समाजातील विचारवंत, कर्तव्यदक्ष व प्रभावशाली व्यक्तींसोबत थेट संवाद साधला. उपस्थितांच्या लिखित स्वरूपातील प्रश्न व शंकांचे उत्तरे त्यांनी दिली. यावेळी व्यासपीठावर प्रांत संघचालक अनिल भालेराव उपस्थित होते.
सरसंघचालक म्हणाले,“तंत्रज्ञान वाईट नसते. पण त्याचे गुलाम आपण व्हायला नको. समाजाची गरज पूर्ण करण्यासाठी आपण काम करतो. त्यामधून आपला उदरनिर्वाह होतो. आपल्याकडचा शेतकरी अजूनही शेती करणे हा माझा धर्म आहे असे सांगतो. हा उदात्त विचार अन्य कुठे नाही. त्यामुळे आपले काम समाजाभिमुख आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. आधुनिक तंत्रज्ञान आपल्या देशातील परिस्थितीशी जुळवून घेतले पाहिजे. आपल्या तंत्रज्ञानामुळे समाजाचे नुकसान होणार नाही, रोजगार कमी होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे असे ते म्हणाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis