व्यवहारातून जात घालवायची असेल तर आधी मनातून गेली पाहिजे - सरसंघचालक
प्रबुद्ध नागरिकांशी संवाद छत्रपती संभाजीनगर, 18 जानेवारी (हिं.स.)। जात व्यवहारातून घालवायची असेल तर आधी मनातून गेली पाहिजे. पूर्वी व्यवसाय आणि कामानुसार जात तयार झाली. नंतर ती समाजाला चिकटली. नंतर जातीभेद सुरू झाला. आजकाल जातीभेद हा अहंकारातून य
जात व्यवहारातून घालवायची असेल तर आधी मनातून गेली पाहिजे.


प्रबुद्ध नागरिकांशी संवाद

छत्रपती संभाजीनगर, 18 जानेवारी (हिं.स.)।

जात व्यवहारातून घालवायची असेल तर आधी मनातून गेली पाहिजे. पूर्वी व्यवसाय आणि कामानुसार जात तयार झाली. नंतर ती समाजाला चिकटली. नंतर जातीभेद सुरू झाला. आजकाल जातीभेद हा अहंकारातून येतो. त्यामुळे जातीभेद संपवण्यासाठी जात न पाहण्याची मनाला सवय करावी लागेल. जर हे सर्वांनी प्रामाणिकपणे केलं तर दहा बारा वर्षात जातीभेद संपुष्टात येईल असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.

राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित समाजातील प्रबुद्ध नागरिकांसोबत संवाद व्हावा यासाठी प्रमुख जन संगोष्ठीचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थित नागरिकांनी त्यांच्या अनेक जिज्ञासा लिखित स्वरूपात विचारल्या. त्यांच्या प्रश्न–शंकांचे समाधान सरसंघचालकांनी विस्तृतपणे केले. यावेळी व्यासपीठावर प्रांत संघचालक अनिल भालेराव उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस विजय राठी यांनी प्रास्ताविक सादर केले. अहिल्याताई धायगुडे व छत्रसाल पांडव यांनी वैयक्तिक गीत गायले. केतकी जोशी यांच्या आवाजात कल्याण मंत्राद्वारे कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तर देताना सरसंघचालक म्हणाले, “संघ हा व्यक्ती निर्माणाचे काम करतो, याशिवाय काहीही करत नाही. संघ प्रतिक्रियेतून तयार झालेले संघटन नाही. संघाची कोणासोबत स्पर्धा देखील नाही. संघाला सर्व समाजाच्या सोबतीने भारताला परम वैभवसंपन्न करायचे आहे. संघाला स्वतः मोठे व्हायचे नाही. संघाला समाजाला मोठे करायचे आहे. संघाला समाजातील संघटन नाही तर, समाजाचे संघटन करायचे आहे. एक वेळ अशी आली पाहिजे की सर्व समाज संघाच्या विचारांनी काम करू लागेल, त्यावेळी संघाची वेगळी ओळख राहणार नाही. हेच संघाला अपेक्षित आहे. त्यामुळे संघ समजून घ्यायचा असेल तर संघाच्या शाखेत आले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande