माजी मंत्री, भाजपचे माजी मुंबई अध्यक्ष राज पुरोहित यांचे निधन
मुंबई, १९ जानेवारी (हिं.स.) : मुंबई भाजपचे माजी अध्यक्ष आणि मुंबईतील उत्तर भारतीयांचे नेते अशी ओळख असणारे ज्येष्ठ नेते राज के पुरोहित यांचे निधन झाले. ते 71 वर्षांचे होते. मुंबईतील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने एक अ
राज पुरोहित


मुंबई, १९ जानेवारी (हिं.स.) : मुंबई भाजपचे माजी अध्यक्ष आणि मुंबईतील उत्तर भारतीयांचे नेते अशी ओळख असणारे ज्येष्ठ नेते राज के पुरोहित यांचे निधन झाले. ते 71 वर्षांचे होते. मुंबईतील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने एक अनुभवी, अभ्यासू आणि जनतेशी नाळ जोडलेला नेता काळाच्या पडद्याआड गेला असून, महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक जीवनात ही मोठी हानी मानली जात आहे.

राज पुरोहित यांचे पार्थिव आज, रविवारी राजहंस बिल्डिंग, जी रोड, मरीन ड्राइव्ह, मुंबई येथे अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

राज पुरोहित हे मुंबई भाजपच्या वर्तुळातील मोठे नाव होते. त्यांनी राज्य सरकारमध्ये मंत्रीपदही भूषविले होते. नुकत्याच झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 221 मधून राज पुरोहित यांचा मुलगा आकाश पुरोहित विजयी झाला होता. राज पुरोहित यांनी २५ वर्षांहून अधिक काळ महाराष्ट्र विधानसभेमध्ये आमदार म्हणून काम केलं होतं. ते मुंबईतील मुंबादेवी आणि कुलाबा मतदारसंघातून १९९०, १९९५, १९९९ आणि २००४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये निवडून आले होते. युती सरकारमध्ये (१९९५-१९९९) त्यांच्यावर कामगार, दुग्धविकास आणि संसदीय कार्य मंत्री म्हणून जबाबदारी पाहिली आहे. तसेच नंतर गृहनिर्माण मंत्री म्हणूनही त्यांनी मुंबईतील भाडेकरूंसाठी महत्त्वपूर्ण काम केले होते.

पुरोहित हे एकेकाळी मुंबई भाजपमधील सामर्थ्यशाली नेते म्हणून ओळखले जात होते. दक्षिण मुंबईत त्यांचा मोठा दबदबा होता. गेल्या काही वर्षांमध्ये कुलाब्यात राहुल नार्वेकर यांची ताकद वाढल्यानंतर ते राजकारणातून काहीसे दूर झाले होते.

मुंबईतील भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री राज पुरोहित यांचं निधन झालं आहे. ७० वर्षीय पुरोहित यांनी आज पहाटे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना १५ जानेवारी रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. एकेकाळी मुंबई भाजपचा प्रमुख चेहरा असलेल्या राज पुरोहित यांच्या निधनाने एक अभ्यासू आणि आक्रमक नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

आमदार आणि मंत्री म्हणून काम करत असतानाच राज पुरोहित यांनी पक्षसंघटनेतही महत्त्वाचे योगदान दिले होते. मुंबई भाजपचे अध्यक्ष म्हणून त्यांनी शहरात भाजपचा विस्तार करण्यास मोलाची भूमिका पार पडली. तसंच पक्षाच्या कठीण काळातही ते निष्ठेने सोबत राहिले. मुंबईतील अमराठी मतदारांना भाजपसोबत जोडण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande