
बीड, 18 जानेवारी, (हिं.स.) | बीड तालुक्यातील लिंबागणेश बालाघाटावरील पंचक्रोशीतील अंजनवती गावात बिबट्याने राजाभाऊ रामकिसन येडे यांच्या बोकडावर हल्ला करून त्याचा फडशा पाडल्याची घटना घडली. या घटनेनंतर वनरक्षक महेश मेटे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला, तर चौसाळा येथील पशुवैद्यकीय अधिकारी बहिरवाळ यांनी मृत बोकडाचे शवविच्छेदन केले.
गेल्या काही दिवसापूर्वी लिंबागणेश पंचक्रोशीमध्ये बिबट्या आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते पुन्हा ही घटना घडली आहे. अर्जुन येडे यांनी शेतात बिबट्या दिसल्याची माहिती ग्रामस्थांना दिली. त्याच सुमारास, राजाभाऊ रामकिसन येडे यांच्या गोठ्यातील बोकड गायब असल्याचे निदर्शनास आले. काही नागरिकांच्या मते बिबट्याने बोकड उचलून नेला असावा. शोध घेतला असता गावापासून सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावरील फड शेतात बोकड छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला. याबाबत रेवण येडे यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळवले .
अंजनवती व परिसरात बिबट्याचा वावर पुन्हा वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नागरिकांनी रात्री एकटे बाहेर पडणे टाळावे, जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत तसेच वनविभागाने तात्काळ उपाययोजना करून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी पुढे आली आहे. वनरक्षक महेश मेटे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis