
मुंबई, १८ जानेवारी (हिं.स.) : दांडगा जनसंपर्क आणि जनतेच्या प्रश्नांसाठी झटणारे क्रियाशील नेतृत्व गमावल्याची शोकभावना व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री राज पुरोहित यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
पुरोहित यांचे अकाली निधन क्लेशदायक असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री श्री . फडणवीस यांनी त्यांच्या कुटुंबियाप्रति शोकसंवेदना व्यक्त केली आहे.
शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात,' दिवंगत पुरोहित यांनी पक्ष संघटनेच्या बांधणीसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. मुंबईतील सामान्यजनांचा आवाज बनून ते सातत्याने क्रियाशील राहीले. मग ते सत्ताधारी पक्षात असो वा विरोधी पक्षात. त्यामुळेच त्यांची मांडणी प्रभावी आणि मार्मिक असे. त्यामुळेच ते आक्रमक शैली आणि बिनतोड संवादासाठी परिचित होते. त्यामुळेच त्यांना जनतेने कुलाबा आणि मुंबादेवी मतदारसंघातून सलगपणे विधानसभेत निवडून पाठवले. मार्गदर्शक आणि अभ्यासू अशा या नेतृत्वाच्या निधनामुळे आम्हा पक्ष परिवारासह, कार्यकर्ते,पुरोहित कुटुंबीय यांच्यावर दुःखाचा आघात झाला आहे. यातून सर्वांनाच सावरण्याचे बळ मिळावे, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. ज्येष्ठ नेते राज पुरोहित यांच्या आत्म्यास सद्गती लाभो अशी प्रार्थना करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो,असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी