डॉ. जगदीश शिंदे यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश
परभणी, 18 जानेवारी (हिं.स.)। सामाजिक कार्यकर्ते तसेच प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. जगदीश शिंदे यांनी आज काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्या निवासस्थानी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश केला. यावेळी कृषी उ
डॉ. जगदीश शिंदे यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश


परभणी, 18 जानेवारी (हिं.स.)।

सामाजिक कार्यकर्ते तसेच प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. जगदीश शिंदे यांनी आज काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्या निवासस्थानी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश केला.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती शामराव धर्मे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती सुभाष आबा कोल्हे, माजी पंचायत समिती सदस्य नारायणराव आढाव, दिनेश रनेर आदी मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, बाभळगाव जिल्हा परिषद गट हा महिला सर्वसाधारणसाठी राखीव आहे. या गटातून माजी सभापती सुभाषराव कोल्हे इच्छुक होते. मात्र वाढते वय लक्षात घेता त्यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या चिरंजीव अनिल कोल्हे हे कान्सूर गणातून निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. बाभळगाव गटातून डॉ. जगदीश शिंदे यांच्या मातोश्री काँग्रेस पक्षाकडून जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच बाभळगाव गणातून उमेदवार निश्‍चित करण्यासाठी चाचपणी सुरू असल्याची माहिती आहे.

एकूणच काँग्रेस पक्षाकडून कासापुरी, लिंबा, बाभळगाव व देवनांद्रा या चारही गटांमध्ये नवतरुणांना संधी देण्यात आल्याने येथील उमेदवार भरघोस मतांनी विजयी होतील, असा विश्वास काँग्रेस कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे. डॉ. जगदीश शिंदे यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे पक्षातील तरुण कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, काँग्रेस पक्षाला जिल्ह्यात आलेली मरगळ दूर करून पक्षाला पुन्हा एकदा जिल्ह्यात अग्रस्थानी नेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी जिल्हाध्यक्षपद स्वीकारल्यानंतर स्पष्ट केले होते. त्याच भूमिकेतून नवतरुणांना संधी देत स्वच्छ चारित्र्याची आणि सक्षम नवी फळी उभारण्याचे काम ते करीत असल्याचे दिसून येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande