
अमरावती, 18 जानेवारी (हिं.स.)
महानगर पालिका निवडणुकीत २०१७ मध्ये ४५ उमेदवारांसह बहुमत मिळवणाऱ्या भाजपला ‘धक्का' देत युवा स्वाभिमानने (वायएसपी) यंदाच्या निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली. भाजपाचे यंदा २५ उमेदवार निवडून आले. २०१७ मध्ये युवा स्वाभिमानचे ३ उमेदवार विजयी झाले होते. यंदा त्यांचे १५ उमेदवार विजयी झालेत. गेल्या वेळच्या तुलनेत वायएसपीचे १२ उमेदवार वाढले आहेत. आश्चर्याची बाब अशी की, भाजपाने निवडणुकीच्या चार दिवस आधी वायएसपीसोबत युती तोडली होती. दोन्ही पक्षांची युती असतील तर दोघांचे एकूण ४० उमेदवार विजयी झाले असते. येथे भाजपाचा डाव त्यांच्याच अंगलट आला.त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजीत पवार गटाने यंदा प्रथमच निवडणुकीत सर्वाधिक ८५ उमेदवार दिले होते. मात्र, त्यांचे ११ उमेदवारच निवडून आले आहेत. मात्र, या पक्षाच्या जिल्ह्यातील पक्षनेतृत्त्वाने २३ ते २५ उमेदवार निवडून येतील, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. ती फोल ठरली. विशेष बाब अशी की, यंदा मतदारांनी सर्वच अपक्षांना नाकारले तर एमआयएमने गेल्या वेळच्या कामगिरीत सुधारणा करीत १२ उमेदवार निवडून आणले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी