
अमरावती, 18 जानेवारी (हिं.स.)।
महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवारांप्रती असलेली मतदारांची नाराजी ‘नोटा’ या पर्यायातून स्पष्टपणे समोर आली आहे. झालेल्या मतदानात तब्बल २७,८६७ मतदारांनी ‘नोटा’चा वापर केला असून हे एकूण मतदानाच्या ७.६७ टक्के इतके आहे. निकालांती ही बाब स्पष्ट झाली.
लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी प्रत्यक्ष मतदान करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र, पसंतीचा उमेदवार नसल्यास अनेक मतदार मतदानापासून दूर राहतात, असे निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आले होते. यावर उपाय म्हणून ‘नोटा’ हा सक्षम पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.या महापालिका निवडणुकीत २२ प्रभागांमधून ८७ सदस्यपदांसाठी ६६१ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. यामध्ये १२६ अपक्ष उमेदवारांचा समावेश होता. उमेदवारी वाटपाचा घोळ मतदानाच्या तीन दिवसांपूर्वीपर्यंत सुरू होता. या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर काही मतदारांची नाराजी ‘नोटा’च्या माध्यमातून व्यक्त झाल्याचे दिसून आले.
‘नोटा’ हे वैध मत असून मतदाराचे मत पूर्णपणे गोपनीय राहते. त्यामुळे कोणताही दबाव न येता मतदार आपला निषेध नोंदवू शकतो. मतदानापासून दूर न राहता प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी ‘नोटा’ देत असल्याने लोकशाही अधिक पारदर्शक व सशक्त करण्याच्या दिशेने हा पर्याय महत्त्वाचा ठरत आहे.
प्रभाग १ मध्ये १२७६, २ मध्ये १४४४, ३ मध्ये ११२७, ४ मध्ये ५४२, ५ मध्ये १५८५, ६ मध्ये ९३८, ७ मध्ये ११२९, ८ मध्ये १३२०, ९ मध्ये ११२९, १० मध्ये १५११, ११ मध्ये १३६६, १२ मध्ये १४६०, १३ मध्ये १२८०, १४ मध्ये २०१, १५ मध्ये २०३, १६ मध्ये ६०७, १७ मध्ये १८१९, १८ मध्ये १४८७, १९ मध्ये १८८५, १९ मध्ये १८८५, २० मध्ये २२३०, २१ मध्ये १०२५ व प्रभाग २२ मध्ये 'नोटा'ला ८४७अशी एकूण २७,८६७ मते मिळाली.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी