
अंजनगाव बारीत 1 किमी अंतरात गतिरोधक नाहीत
अमरावती, 18 जानेवारी (हिं.स.)
अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव बारी गावातून जाणाऱ्या नागपूर-मुंबई राजमार्गावरील एक किलोमीटरच्या सिमेंट काँक्रीटीकरण केलेल्या रस्त्यावर एकही गतिरोधक नाही. यामुळे या मार्गावरून सुसाट वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे अपघातांचा धोका वाढला आहे. सध्या या मार्गाचे सौंदर्यीकरण सुरू असून, या कामादरम्यान गतिरोधक बसवण्याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
या मार्गावर यापूर्वी अनेक किरकोळ आणि गंभीर अपघात झाले आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्पुरत्या रबरी गतिरोधकांची व्यवस्था केली होती. मात्र, हे गतिरोधक अवघ्या तीन महिन्यांतच खराब झाले. यामुळे आता दोन्ही बाजूंनी येणारी वाहने वेगाने धावत असल्याने अपघातांची शक्यता अधिक वाढली आहे.
या मार्गावर बस थांबे, शाळा, महाविद्यालये, आरोग्य केंद्र, पशु चिकित्सालय, तीर्थक्षेत्र कोंडेश्वर, आठवडी बाजार, स्मशानभूमी, भिवापूर तलाव आणि अनेक मंदिरे आहेत. त्यामुळे रस्ता ओलांडताना पादचारी आणि वाहनचालकांना मोठी गैरसोय होते. ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि रुग्णांना विशेष काळजी घ्यावी लागते.या मार्गाच्या दुतर्फा झाडाझुडपांचे प्रमाण वाढले असून, त्यांच्या काटेरी फांद्या रस्त्यावर आल्या आहेत. यामुळे बसच्या खिडक्यांवर फांद्या आदळून प्रवाशांना इजा होण्याची शक्यता आहे, तसेच इतर वाहनचालकांनाही गैरसोय होत आहे. सौंदर्यीकरणाचा भाग म्हणून एक हजार मीटरपर्यंत रस्ता दुभाजक बांधून पथदिव्यांचे नियोजन केले आहे. मात्र, यासाठी जुने पथदिवे गेल्या चार महिन्यांपासून बंद ठेवण्यात आले आहेत, ज्यामुळे रात्रीच्या वेळी अंधार असतो.तालुका क्रीडा संकुलाचा परिसर वगळता, या राजमार्गाच्या दुतर्फा नागरिकांनी अतिक्रमण केले आहे. यामुळे रस्त्यावरील पाणी वाहून जाण्यासाठी नाल्यांचे नियोजन करणे कठीण झाले आहे. अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी या मार्गावर मजबूत व टिकाऊ गतिरोधक, झाडाझुडपांची छाटणी आणि पथदिव्यांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. स्थानिक प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे याबाबत तक्रार केली असून, विभागाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे.या मार्गाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडे, गतिरोधकांचा अभाव, बंद पथदिवे आणि वाढते अतिक्रमण यामुळे हा मार्ग अपघातप्रवण बनला आहे. हा राजमार्ग अमरावतीहून अंजनगाव बारीमार्गे थेट वर्धा-नागपूर, यवतमाळ-हिंगणघाटला जोडतो. या मार्गावरून राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवा देखील सुरू झाल्या आहेत, त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी