
नांदेड, 18 जानेवारी (हिं.स.)। नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात आपण मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत. त्या जोरावर शिवसेनेचे तीन आमदार असताना आपण एकटे लढलो. मतदानाच्या आदल्या दिवशी आमच्यासाठी चांगले वातावरण होते. आम्ही धनशक्तीने कमी पडलो आणि रात्रीतून काय झाले माहिती नाही वारे फिरले. आणि आमच्या उमेदवारांचा पराभव झाला, अशी खंत शिंदे शिवसेनेचे आ. बालाजीराव कल्याणकर यांनी व्यक्त केली.
नांदेड शहरात आपल्यासह शिंदे शिवसेनेचे ३ आमदार आहेत. परंतु आम्ही केलेल्या विकास कामाच्या जोरावर नांदेड उत्तर मतदारसंघात
शिवसेनेच्या चांगल्या जागा येतील असे वातावरण होते. परंतु आम्हाला केवळ ४ जागा मिळाल्या आम्ही कुठे कमी पडलो याचे आत्मचिंतन करून आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका पूर्ण ताकदीनिशी लढू असे आ. कल्याणकर यांनी सांगितले. सांगवी प्रभागात शिवसेनेचे पदाधिकारी श्याम कोकाटे यांच्या मातोश्रीसह इतर उमेदवार उभे होते. त्यांच्या विरोधात मीनल पाटील यांनी बंडखोरी केली. आम्ही कोकाटे व इतर अधिकृत उमेदवारासोबत राहिलो. परंतु हदगावमधील शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी नांदेड शहरात येऊन अपक्ष उमेदवाराचा प्रचार केला. याबाबत पक्षश्रेष्ठींना कल्पना देण्यात आली आहे.
निवडणुकीपूर्वी शिवसेनेला सन्मानजनक जागा मिळाल्या असत्या तर आम्ही भाजपाबरोबर युती केली असती. यापुढेही त्यांनी सकारात्मकता दाखविली तर आपण युती करू, असे आ. कल्याणकर म्हणाले. भाजपा नेते खा. अशोकराव चव्हाण यांच्या शिवाजीनगर या बालेकिल्ल्यात दुष्यंत सोनाळे यांची जागा तसेच बापुराव गजभारे यांच्या कन्येची जागा आम्ही थोड्या फरकाने गमावली. मतदानाच्या आदल्या दिवशी आमच्यासाठी चांगले वातावरण होते. आम्ही धनशक्तीने कमी पडलो आणि रात्रीतून काय झाले माहिती नाही वारे अचानक फिरले. आणि आमच्या उमेदवारांचा पराभव झाला, अशी खंत आ. कल्याणकर यांनी व्यक्त केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis