
अमरावती, 18 जानेवारी (हिं.स.) | महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने २५ जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष म्हणून आपले स्थान कायम राखले असले, तरी अद्याप सत्तास्थापनेचा स्पष्ट मार्ग पक्षाला मिळालेला नाही. बहुमताचा आकडा गाठण्यासाठी आवश्यक असलेले संख्याबळ अपुरे ठरत असल्याने आता राजकीय हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर युवा स्वाभिमान पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीतील घटक पक्षांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
युवा स्वाभिमान पक्षाला १५ जागा मिळाल्या असून पक्षाचे अध्यक्ष आमदार रवी राणा यांनी सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची गरज भासणार नसल्याचे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे राजकीय गणिते अधिकच गुंतागुंतीची झाली आहेत. दरम्यान, महायुतीतील महत्त्वाचा घटक असलेल्या शिवसेना शिंदे गटाकडे सध्या सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे. शिंदे गटाचे तीन नगरसेवक निवडून आले असून, ही संख्या सत्तास्थापनेत ‘किंगमेकर’ ठरू शकते.
शिवसेना शिंदे गटाचे राष्ट्रीय सचिव व माजी आमदार अभिजीत अडसूळ यांनी सध्या आम्ही ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत असल्याचे स्पष्ट केले आहे. ते म्हणाले की, आमची भाजपसोबत नैसर्गिक युती आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी आमची गरज लागणार हे निश्चित असले तरी अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी याबाबत चर्चा झाली असून परिस्थितीचा आढावा घेऊन येत्या काही दिवसांत निर्णय घेतला जाईल.
युवा स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष रवी राणा यांनी आपली भूमिका जाहीर केली असली तरी त्यांच्या पक्षाचा निर्णय त्यांनाच घ्यायचा आहे, असेही अडसूळ यांनी नमूद केले. महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील स्वतंत्रपणे आपला निर्णय घेईल, त्यावर भाष्य करणे उचित नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. आमच्या पक्षाच्या हिताचा विचार करूनच आम्ही पुढील भूमिका ठरवू, असे त्यांनी ठामपणे सांगितले.निवडणुकीपूर्वी भाजपकडून शिवसेना आणि युवा स्वाभिमान पक्षासोबत एकाचवेळी युतीसंदर्भात चर्चा सुरू होती. मात्र त्या वेळी युती होऊ शकली नाही. आता निवडणूक निकालानंतर परिस्थिती स्थिरस्थावर झाल्यावर योग्य निर्णय घेता येईल, असा विश्वास अडसूळ यांनी व्यक्त केला. विशेष म्हणजे सत्तास्थापनेसाठी विरोधकांकडूनही आम्हाला विचारणा झाली असल्याचे त्यांनी सांगितले. विरोधी पक्षांकडूनही हालचाली सुरू असून योग्य वेळी शिवसेना शिंदे गट आपली स्पष्ट भूमिका जाहीर करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी