
पुणे, 18 जानेवारी (हिं.स.)जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली असून गेल्या दोन दिवसांत जिल्हा परिषदेच्या गटांसाठी पाच अर्ज आले असून पंचायत समितीच्या गणांसाठी ४ अर्ज दाखल झाले आहेत. आतापर्यंत ७३ गटांसाठी ९४० अर्जांची विक्री झाली असून १४६ गणांसाठी १ हजार २६५ अर्ज इच्छुकांनी नेले आहेत. अर्ज भरण्याची अंतिम तारीख २१ जानेवारी आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू करण्यात आली असून अर्ज भरण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली. अर्ज भरण्याची अंतिम मुदत २१ जानेवारी असून दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जातील. दरम्यान, १८ जानेवारी रोजी रविवार असल्याने त्या दिवशी उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.गेल्या दोन दिवसांत जिल्हा परिषदेच्या ७३ गटांसाठी एकूण ९४० अर्जांची विक्री झाली आहे. त्यात शुक्रवारी ५३५ अर्जांची विक्री झाली व एक अर्ज प्राप्त झाला तर शनिवारी ४०५ अर्जांची विक्री होऊन ४ अर्ज दाखल झाले. आतापर्यंत एकूण ५ अर्ज दाखल झाले आहेत. त्यात प्रत्येकी २ अर्ज इंदापूर व खेड तालुक्यामधून आले आहेत तर एक अर्ज हवेलीतून आला आहे. यात ४ पुरुष तर एक महिला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु