
सोलापूर, 18 जानेवारी (हिं.स.)।
महापालिकेत भाजपने १०२ पैकी ८७ जागा पटकावल्या आहेत. दहा नगरसेवकांमागे एक स्वीकृत नगरसेवक अशी रचना आहे. भाजपने जिंकलेल्या जागांमधून नऊ स्वीकृत नगरसेवक त्यांचे असणार आहेत. आपला महत्त्वाचा उमेदवार पराभूत झाला तर त्यास स्वीकृत म्हणून घेता येईल, अशी आशा शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना होती. पण, भाजपशिवाय अन्य कोणत्याही पक्षाला स्वीकृत नगरसेवक घेता येईल, अशा जागा मिळालेल्या नाहीत. त्यामुळे यंदा महापालिकेत १० नव्हे, नऊच स्वीकृत नगरसेवक असतील.सोलापूर महापालिकेत भाजपला ८७, एमआयएमला आठ, शिवसेनेला चार आणि काँग्रेसला दोन तर राष्ट्रवादी काँग्रेसला एकाच जागेवर विजय मिळाला. १० नगरसेवकांमागे एक स्वीकृत नगरसेवक घेता येतो. भाजपकडून आता नाराज झालेल्या सच्चा कार्यकर्त्याला त्या ठिकाणी संधी दिली जाणार आहे. आता तिन्ही आमदारांना त्यांच्या मतदारसंघातील प्रत्येकी एका कार्यकर्त्याला ‘स्वीकृत’मधून नगरसेवकाची संधी देता येणार आहे. सर्वानुमते आणखी एकास स्वीकृत नगरसेवक करता येणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड