
नांदेड, 18 जानेवारी (हिं.स.)।
नांदेड महानगरपालिकेच्या
निवडणुकीत अनेक दिग्गजांचा झालेला जय अन् पराजय राजकीय वर्तुळाच्या चर्चेच्या पटलावर आले आहेत. त्यात काँग्रेसच्या खासदार पुतण्याच्या माजी उपमहापौर काकाचा झालेला दारुण पराभवही चांगलाचा चर्चेस्थानी आला आहे. हा पराभव काका-पुतण्याच्या अगदी जिव्हारी लागला असल्याचे बोलले जात आहे.
महापालिकेच्या राजकारणात काँग्रेसचे माजी उपमहापौर आनंद चव्हाण हे निवडणुक रिंगणात ते हनुमानगढ प्रभाग क्र. ४ मधून उतरले होते. आनंद चव्हाण व खासदार रविंद्र चव्हाण हे काका-पुतणे होत. मागील काळात काही' टर्म' नगरसेवक अन् उपमहापौर असा त्यांचा आजवरचा राजकीय प्रवास राहिला. महापालिकेच्या सन २०१७मधील निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक ७३ जागा जिंकल्या होत्या. या निवडणुकीत काँग्रेसचा हा पूर्वापार 'गड' कायम राखण्याचे आव्हान खा. रविंद्र चव्हाण यांच्यापुढे उभे ठाकलेले होते. या दिशेने प्रयास करताना त्यांनी वंचित बहुजन आघाडी या समविचारी पक्षाशी आघाडी केली. त्याचा सकारात्मक परिणाम पाहता, काँग्रेसच्या १० तर वंचित बहुजन आघाडीचे प्रथमच ५ नगरसेवक निवडून आले. परंतु त्यांना काँग्रेसचा सन २०१७ चा' गड' राखता आला नाही. शिवाय हनुमानगढ प्रभाग क्र. ४ मधून काका माजी उपमहापौर
आनंद चव्हाण यांचा मोठ्या मतांच्या फरकाने झालेला पराभवही रोखता आला नाही. ही 'हार' खा. रविंद्र चव्हाण यांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. सदर प्रभागात काँग्रेस विरुध्द
भाजपा अशी सरळ लढत झाली. या लढतीत भाजपाचे प्रशांत तिडके यांनी काँग्रेसचे आनंद चव्हाण यांच्यावर १ हजार ८७३ मतांनी मात केली. तिडके यांना ६ हजार ३८० तर चव्हाण यांना ४ हजार ५०७ मते मिळाली.
दरम्यान महापालिकेच्या या निवडणुकीत काँग्रेसची ७३ एवढ्या संख्याबळावरुन चक्क १० वर घसरण झाल्याने आणि काकांचा विजयही खेचून आणता आला नसल्याने जिल्ह्याच्या काँग्रेसचे नेतृत्व म्हणून खा. रविंद्र चव्हाण यांना मंथन अन् आत्मचिंतन करावे लागणार आहे. परंतु या पराभवाची ते कारणमिमांसा करणार का? हा खरा प्रश्न आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis