
बीड, 18 जानेवारी (हिं.स.)।
या वर्षी शिष्यवृत्ती परीक्षेतील काठीण्य पातळी घटवून अभ्यासक्रमात काही प्रमाणात बदल केला आहे. हा बदल लक्षात घेता जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना यामध्ये अधिकाधिक यश मिळावे यासाठी खुद्द सीईओंनी लक्ष घातले आहे. फेब्रुवारी महिन्यात होत असलेल्या परीक्षेपूर्वी ४ सराव चाचण्या होणार आहेत. यातील पहिली चाचणी ५ हजार विद्यार्थ्यांनी दिली. परीक्षेची भीती कमी करणे, वेळेचे नियोजन अन् प्रश्नांतील शॉर्टकर्ट कळावेत हा उद्देश यामागे ठेवण्यात आला आहे.
जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षेची पहिली सराव चाचणी पार पडली. चाचणी सुरळीत झाली. बीड तालुक्यातील चंपावती प्राथमिक विद्यालय येथे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांनी भेट दिली. पूर्व माध्यमिक पाचवीसाठी ४ हजार ५४५ विद्याथ्यर्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ३ हजार ९२१ विद्यार्थी उपस्थित होते. उपस्थिती ८६.२७ टक्के होती. आठवीसाठी १ हजार २१४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १ हजार १७ विद्यार्थी उपस्थित होते. उपस्थिती ८३.७७टक्के होती. प्रश्नपत्रिका मराठी आणि उर्दू माध्यमासाठी तयार करण्यात आल्या. ओपन लिंक फाउंडेशन पुणे यांच्या विनोबा अॅपच्या माध्यमातून ओएमआर स्कॅनिंग करून उत्तरपत्रिका तपासल्या जातील. निकाल ५ दिवसांत जाहीर केला जाईल. विद्याथ्यर्थ्यांनी कोणत्या प्रश्नात चूक केली हे शिक्षकांना समजेल. त्यामुळे त्या भागाचा अधिक सराव करता येईल. प्रत्येक सराव परीक्षा परीक्षेच्या वातावरणात घेतली जाईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis