
नांदेड, 18 जानेवारी, (हिं.स.)।
अल्पवयीन विद्यार्थी व मुले विनापरवाना दुचाकी वाहने चालवित असून हा प्रकार गंभीर आहे. अशा प्रकारामध्ये संबंधित पालकावर थेट गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशारा नांदेड जिल्ह्यातील मनाठयाचे सपोनि विलास चवळी यांनी दिला आहे.
१८ वर्षे पूर्ण न झालेल्या व वाहन चालविण्याचा परवाना नसलेल्या मुलांच्या ताब्यात वाहने देणे हे बेकायदेशीर आहे. अल्पवयीन मुलामुलींकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित पालक. वाहन मालक व चालकांना दोषी धरले जाईल. त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता,. मोटर वाहन कायदा, बाल न्याय कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. ५० सीसीपेक्षा अधिक क्षमतेचे वाहन चालविल्यास २५ हजार रुपयांपर्यंत दंड व ३ वर्षे सक्तमजुरीही शिक्षा ही होवू शकते. तसेच अपघात झाल्यास विमा दावा नाकारला जाण्याची तरतूद आहे. गुन्हा दाखल झाल्यास भविष्यात नोकरी पासपोर्ट व चरिर्त्य प्रमाणपत्र मिळण्यास अडचण निर्माण होऊ शकतात. तसेच वयाच्या २५ वर्षापर्यंत वाहन परवाना नाकारल्या जाऊ शकतो. किंवा वाहन नोंदनी रद्द होण्याची शक्यता आहे.
अल्पवयीन पाल्यांच्या हाती कोणतीही वाहन देऊन त्यांचा जीव धोक्यात घालू नये सायकल किंवा ई सायकल. सुरक्षित पर्याय उपलब्ध करून घ्यावा. यासोबतच मर्यादेपेक्षा अधिक आवाज करणारे सायलेन्सर. विनानंबर प्लेट वाहन, रस्त्यावर अडथळा निर्माण करणारे अयोग्य पार्किंग या विरोधातही कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ऑटो चालकांनी परवाना आरसी बुक व विम्याची कागदपत्रे नेहमी सोबत ठेवावीत असेही आवाहन करण्यात आले आहे. या सर्व सूचनांच्या अनुषंगाने मनाठा पोलीस स्टेशन कार्यक्षेत्र अंतर्गत वारंवार विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे असेही चवळी यांनी सांगितले. अधिकचा आवाज व सायलेन्सर काढून वाहन चालवित असल्यामुळे इतर सामान्य लोकांना याचा मोठा त्रास होत आहे. असे वाहन चालविणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. पोलीस ठाणे क्षत्र अंतर्गत काही टुकारांकडून असा प्रकार सातत्याने होत असल्याचे लक्षात आले आहे. असेही चवळी म्हणाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis