
सोलापूर, 18 जानेवारी (हिं.स.)।
श्री क्षेत्र पंढरपूर येथे माघ शुद्ध 1 ते 5 या कालावधीत संपन्न होणाऱ्या श्री विठ्ठल रुक्मिणीमातेच्या शाही विवाह सोहळ्याची जय्यत तयारी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने करण्यात आली आहे, वसंत पंचमी अर्थात दि. 23 जानेवारी रोजी परंपरेनुसार विवाह सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थित संपन्न होणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.श्री रुक्मिणी स्वयंवर कथेचे आयोजन दि. 19 ते 22 जानेवारी या कालावधीत दररोज दुपारी 4 ते 6 या वेळेत करण्यात आले आहे. या कथेचे निरूपण श्री क्षेत्र पंढरपूर येथील प्रख्यात श्रीमद्भागवताचार्य साध्वी अनुराधा (दीदी) राजेंद्र शेटे यांच्या सुमधूर व रसाळ वाणीने होणार आहे. वसंत पंचमी दिनी सकाळी 10 ते 12 या वेळेत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा विधिवत मंत्रोच्चारात संपन्न होणार आहे. पहाटे काकडआरतीवेळी श्री विठ्ठलास सोन्याच्या मुकुटाऐवजी मंदिरातील पांढरे पागोटे परिधान करण्यात येते. या दिवसापासून रंगपंचमीपर्यंत श्री विठ्ठलास पांढरा पोशाख परिधान केला जातो. नित्यपूजेच्या वेळी श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेस गुलाल अर्पण करण्यात येतो. वसंत पंचमीच्या दिवशी फक्त याच दिवशी श्री रूक्मिणी मातेस सकाळी पांढरा पोशाख परिधान करण्यात येतो.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड