
रायगड, 19 जानेवारी (हिं.स.)।अलिबागचा अभिमान ठरलेला आणि नागरिकांचे खास आकर्षण असलेला लायन्स फेस्टिव्हल यंदा भव्य व दिमाखदार स्वरूपात २३ ते २७ जानेवारी २०२६ या कालावधीत अलिबागच्या समुद्रकिनारी आयोजित करण्यात आला आहे. व्यापार, मनोरंजन आणि सामाजिक बांधिलकीचा अनोखा संगम असलेला हा महोत्सव गेल्या अनेक वर्षांपासून व्यावसायिक, उद्योजक, पर्यटक आणि स्थानिक नागरिकांना आकर्षित करत आहे.
लायन्स क्लब ऑफ अलिबागच्या ५१ वर्षांच्या सामाजिक सेवाभावी परंपरेतून यंदाचा १९ वा लायन्स फेस्टिव्हल साजरा होत असून, या फेस्टिव्हलमधून मिळणारा संपूर्ण निधी नेत्रदान, मोतीबिंदू शस्त्रक्रिया तसेच विविध आरोग्यविषयक उपक्रमांसाठी वापरण्यात येणार आहे. सामाजिक बांधिलकी जपत आरोग्यसेवेसाठी हातभार लावणे, हे या फेस्टिव्हलचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे आयोजकांनी सांगितले. फेस्टिव्हलचे उद्घाटन २३ जानेवारी रोजी होणार असून, राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि औद्योगिक क्षेत्रातील मान्यवर या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. पाचही दिवस विविध सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.
या फेस्टिव्हलमध्ये १७५ हून अधिक स्टॉल्स, नामांकित ब्रँड्स, ज्वेलरी, पैठणी व वस्त्रोद्योगाचे भव्य प्रदर्शन तसेच चारचाकी व दुचाकी वाहनांचे प्रदर्शन व विक्री होणार आहे. यासोबतच ५० हून अधिक खाद्यदालनांमधून विविध व्हेज व नॉनव्हेज पदार्थांची चवदार मेजवानी नागरिकांना अनुभवता येणार आहे. आधुनिक हँगर पद्धतीची आकर्षक मांडणी हे फेस्टिव्हलचे वैशिष्ट्य ठरणार आहे. कराओके, नृत्यस्पर्धा, पाककला स्पर्धा, स्टँडअप कॉमेडी, बँड परफॉर्मन्स अशा कार्यक्रमांमुळे हा महोत्सव सर्व वयोगटांसाठी पर्वणी ठरणार आहे. लायन्स क्लब ऑफ अलिबागच्या वतीने नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सामाजिक उपक्रमाला पाठबळ द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके