

रायगड, 19 जानेवारी (हिं.स.)। ‘मुलाचे पाय पाळण्यात दिसतात’ या म्हणीला साजेसे उदाहरण अलिबाग तालुक्यातील मांडवखार गावातील धडाडीची खेळाडू आभा जितेंद्र म्हात्रे हिने घडवून आणले आहे. वडिलांचा क्रीडा क्षेत्रातील वारसा डोळ्यांसमोर पाहत वाढलेली आभा आज शूटिंग बॉलच्या मैदानात आपल्या पदलालित्याने, अचूक खेळाने आणि कडक माऱ्याने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
आपल्या सातत्यपूर्ण मेहनतीच्या आणि उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर आभाची ऑल इंडिया शूटिंग बॉल चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी निवड झाली असून, तिने सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत मुंबई संघाचे प्रतिनिधित्व केले. राष्ट्रीय पातळीवर खेळणारी ती रायगड जिल्ह्यातील पहिली महिला शूटिंग बॉल खेळाडू ठरली आहे. तिच्या या यशामुळे मांडवखार गावासह संपूर्ण अलिबाग तालुक्यात अभिमानाचे वातावरण आहे.
शूटिंग बॉलचे नियम, तंत्र आणि खेळाचे बाळकडू आभाला घरातूनच मिळाले आहे. तिचे वडील जितेंद्र म्हात्रे हे विद्युत क्रीडा मंडळ, मांडवखार या शूटिंग बॉल संघाचे ज्येष्ठ खेळाडू व कर्णधार असून, आजही त्यांच्या खेळातील अनुभव आणि नेतृत्व सर्वांना प्रेरणादायी ठरते. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली आभाने आपल्या खेळाला योग्य दिशा दिली.
दरम्यान, विद्युत क्रीडा मंडळ मांडवखार संघाने अनेक स्पर्धांमध्ये आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. या संघातील जंप शूटर परेश मोकल याची महाराष्ट्र संघात निवड झाली असून, उत्कृष्ट लिफ्टिंग खेळाडू रत्नेश मोकल आणि आभा म्हात्रे यांची मुंबई युनिटमध्ये निवड झाली आहे. हे खेळाडू केवळ आपल्या संघाचा नावलौकिक वाढवत नाहीत, तर अलिबाग तालुका आणि रायगड जिल्ह्याचे नाव देशपातळीवर उज्ज्वल करत आहेत. ---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके