
अकोला, 19 जानेवारी (हिं.स.)।
अकोला तालुक्यातील घुसर येथे सावकारी कर्जाच्या ओझ्याला कंटाळून अल्पभूधारक शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना आज सायंकाळी सहा वाजता घडली. राजू श्याम गोपनारायण (वय ५०) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्याकडे ७४ गुंठे शेती असून शेतीसाठी तसेच खाजगी सावकारांकडून घेतलेल्या कर्जामुळे त्यांच्यावर सुमारे चार लाख रुपयांचे कर्ज होते. आज सायंकाळी राजू गोपनारायण घरात न दिसल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला असता ते शेतात विषारी औषध प्राशन केलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, अविवाहित मुलगा तुषार (वय २५) व विवाहित मुलगी असा परिवार आहे. पुढील महिन्यात मुलाचे लग्न हे 22 तारखेला ठरले होते. मात्र मुलाच्या लग्नाआधीच पित्याने आत्महत्या केल्याने मुलासह गोपनारायण कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला. घटनेची माहिती अकोट फाईल पोलीस ठाण्यात देण्यात आली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे