महापौरपद देणार असाल, तर समर्थन देतो; ठाकरे सेनेच्या मागणीने ट्विस्ट
चंद्रपूर, 19 जानेवारी (हिं.स.)।महापौर आरक्षणाची सोडत गुरुवारी निघण्याची शक्यता आहे. त्यापूर्वीच चंद्रपूर महापालिकेत सत्ता स्थापण्यासाठी हालचालींना वेग आला आहे. महापौरपद देत असाल तरच समर्थन देऊ अशी ठाम भूमिका शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षान
महापौरपद देणार असाल, तर समर्थन देतो; ठाकरे सेनेच्या मागणीने ट्विस्ट


चंद्रपूर, 19 जानेवारी (हिं.स.)।महापौर आरक्षणाची सोडत गुरुवारी निघण्याची शक्यता आहे. त्यापूर्वीच चंद्रपूर महापालिकेत सत्ता स्थापण्यासाठी हालचालींना वेग आला आहे. महापौरपद देत असाल तरच समर्थन देऊ अशी ठाम भूमिका शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने घेतली आहे. दरम्यान, मनपात शिवसेना (उबाठा) व वंचित बहुजन आघाडीचा आठ सदस्यांचा एक गट तयार केला गेला आहे.

चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. ६६ सदस्य असलेल्या मनपामध्ये भाजपचे २३ तर शिवसेनेचा एक असे मिळून युतीचे २४ संख्याबळ आहे. तर काँग्रेसचे २७ व भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे ३ सदस्य असल्याने काँग्रेसचे संख्याबळ ३० आहे.

सत्ता स्थापनेसाठी ३४ ही मॅजिक फिगर आहे. शिवसेना (उबाठा) ६, वंचित बहुजन आघाडी २, अपक्ष २ तर बसप व एमआयएमकडे प्रत्येकी एक नगरसेवक आहे. भाजपला १० तर काँग्रेसला ४ जागांची गरज आहे. आता मनपात शिवसेना (उबाठा) व वंचित बहुजन आघाडीचा आठ सदस्यांचा एक गट तयार केला आहे. सत्ता स्थापनेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्याची स्थिती असलेल्या शिवसेना(उबाठा)ला काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांकडून समर्थनाबाबत आधीच विचारणा झालेली आहे.

दरम्यान, 'राज्यस्तरावर महाआघाडी असताना आजवर प्रत्येक वेळेस आम्ही नमते घेतले. त्यामुळे अनेकवेळा पदापासून आम्ही दुरावलो. पण कधीही पदाची अपेक्षा केली नाही. प्रत्येक निवडणुकीत एकदिलाने साथ दिली. पण आता आमची इच्छा आहे की, मनपात शिवसेनेचाच महापौर बसावा, जो कोणी आम्हाला महापौरपद देईल, त्यालाच आमचे समर्थन राहील,' अशी ठाम भूमिका घेतली असल्याचे शिवसेनेचे (उबाठा) जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांनी सांगितले.'आमच्या गटाला साथ दिल्यास त्याचा सकारात्मक परिणाम आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत दिसून येईल, तेव्हा मोठ्या मनाने काँग्रेसने आमची इच्छा पूर्ण करावी. मनपातील उर्वरित पदांसाठी फारसा आग्रह धरणार नाही,' अशीही पुष्टी गिऱ्हे यांनी जोडली.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande