चिपळूणच्या नगराध्यक्षांना भंगार व्यावसायिकांना इशारा
रत्नागिरी, 19 जानेवारी, (हिं. स.) : चिपळूणचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी आज शहरात भंगार व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांची विशेष बैठक घेतली. यावेळी त्यांनी भंगार व्यवसाय कायदेशीर पद्धतीने करावा, शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी सर्वांची आहे, असा इशारा दि
चिपळूणच्या नगराध्यक्षांना भंगार व्यावसायिकांना इशारा


रत्नागिरी, 19 जानेवारी, (हिं. स.) : चिपळूणचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी आज शहरात भंगार व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांची विशेष बैठक घेतली. यावेळी त्यांनी भंगार व्यवसाय कायदेशीर पद्धतीने करावा, शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी सर्वांची आहे, असा इशारा दिला.

“तुम्ही व्यवसाय करा, मात्र तो नियमांनुसार व कायदेशीर असावा. शहरातील नागरिकांना मोकळा श्वास घेता यावा, यासाठी योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे,” असे नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी सांगितले.

भंगार गोळा करण्यासाठी शहरात फिरणाऱ्या हातगाड्या, अथवा तीनचाकी वाहनांवर पालिकेचे अधिकृत स्टिकर लावणे बंधनकारक राहील. तसेच संबंधित वाहनचालकांच्या गळ्यात ओळखपत्र असणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या वाहनांना चिपळूण पालिकेकडून अधिकृत परवाना देण्यात येणार असून, त्यासाठी वर्षाला २००० रुपये फी आकारण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

बैठकीत भंगार व्यवसाय करताना शहर स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी, रस्त्यावर गाड्या उभ्या करताना वाहतूक कोंडी होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या. तसेच भंगार गोदामाच्या परिसरात टायर किंवा अन्य ज्वलनशील पदार्थ जाळण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

भंगार गोळा करण्यासाठी ज्या गाड्या फिरतात, तो कर्मचारी कुठून आला, त्याचा मालक कोण आहे, या सर्वांची माहिती पालिकेत द्यावी, पालिकेतून ओळखपत्र आणि गाडीसाठी स्टिकर दिला जाईल, असे त्यांनी सांगितले.

नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशाराही नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी यावेळी दिला.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande