
रत्नागिरी, 19 जानेवारी, (हिं. स.) : दोन वर्षे चिपळूणचे प्रशासक म्हणून उत्कृष्ट कामगिरी करणारे, कर्तव्यदक्ष व अभ्यासू मुख्याधिकारी विशाल श्रीरंग भोसले यांची पदोन्नतीने बदली झाली आहे. ते आता सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर नगर परिषदेत मुख्याधिकारी म्हणून रुजू होणार आहेत.भोसले यांच्या जागी संजय जाधव नवे मुख्याधिकारी लवकरच चिपळूणला रुजू होतील. ही बदली आज शासनाचे अवर सचिव अशोक लक्कस यांनी जारी केलेल्या आदेशानुसार करण्यात आली आहे.
भोसले यांनी चिपळूण हे आपलेच शहर मानून दोन वर्षे प्रशासक म्हणून अत्यंत प्रामाणिकपणे सेवा बजावली. त्यांच्या कार्यकाळात आरोग्य, पाणीपुरवठा, स्वच्छता यावर विशेष भर देण्यात आला. ‘माझी वसुंधरा’ अभियानात चिपळूण शहराला कोकणात पहिला, तर राज्यात १४वा क्रमांक मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.नव्या पिढीमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी, यासाठी त्यांनी दर रविवारी ‘वाचू आनंदाने’ हा अभिनव उपक्रम सुरू केला. इंधन बचत व पर्यावरण संवर्धनासाठी दर महिन्याच्या एक तारखेला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सायकलने किंवा चालत कार्यालयात यावे, हा उपक्रम राबवण्यात आला. स्वतःही ते सायकलने नगर पालिकेत येत असत.
चिपळूण शहर प्लास्टिकमुक्त व्हावे, यासाठी महिलांसाठी ‘होम मिनिस्टर’ स्पर्धा घेण्यात आली, ज्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लोकमान्य टिळक स्मारक वाचनालय, आंबेडकर वाचनालय यांसह शहरातील विविध संस्था व मंडळांशी त्यांचे जिव्हाळ्याचे ऋणानुबंध निर्माण झाले होते.स्वच्छतेसाठी अभिनेते ओंकार भोजने यांची स्वच्छता दूत म्हणून नियुक्ती करणारी चिपळूण ही राज्यातील पहिली नगरपालिका ठरली. प्रांताधिकारी आकाश लिगाडे, अभिनेते ओंकार भोजने आणि चिपळूणवासीयांच्या सहभागातून त्यांनी भव्य स्वच्छता मोहिमा राबवल्या. स्वच्छ पाणी, आरोग्य व विकासकामांसाठी ते सातत्याने प्रशासकीय पातळीवर प्रयत्नशील राहिले.
चिपळूण शहराला पुराचा फटका बसू नये यासाठीही मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी विशेष प्रयत्न केले. पावसाळ्यापूर्वीच दक्षता म्हणून आपत्ती निवारणाची बैठक राज्यात सर्वांत आधी घेण्याचा विक्रम त्यांनी केला. संभाव्य धोके लक्षात घेऊन प्रशासन, आपत्कालीन यंत्रणा आणि संबंधित विभागांना सतर्क राहण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.गेल्या पावसाळ्यात मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर ते रात्रभर जागून, अक्षरशः जागता पहारा देत परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. शहरातील नदीपातळी, धोकादायक भाग, मदतकार्य याचा सातत्याने आढावा घेत त्यांनी चिपळूणवासीयांच्या सुरक्षिततेची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी