रत्नागिरी : ‘बांधावरचे संमेलन’च्या बोधचिन्हाचे अनावरण
रत्नागिरी, 19 जानेवारी, (हिं. स.) : धामणवणे (ता. चिपळूण) येथे होणार असलेल्या पहिल्या बांधावरच्या संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण स्वागताध्यक्ष नगरसेवक शशिकांत मोदी यांच्या हस्ते झाले. महाराष्ट्राच्या साहित्य क्षेत्रातील आजवरचा आगळावेगळा प्रयोग अशी
रत्नागिरी : ‘बांधावरचे संमेलन’च्या बोधचिन्हाचे अनावरण


रत्नागिरी, 19 जानेवारी, (हिं. स.) : धामणवणे (ता. चिपळूण) येथे होणार असलेल्या पहिल्या बांधावरच्या संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण स्वागताध्यक्ष नगरसेवक शशिकांत मोदी यांच्या हस्ते झाले.

महाराष्ट्राच्या साहित्य क्षेत्रातील आजवरचा आगळावेगळा प्रयोग अशी महाराष्ट्रभरातील जिज्ञासूंमध्ये ओळख आणि उत्सुकता बांधावरच्या संमेलनाने मिळविली आहे. संमेलनाच्या नियोजनाबाबतची दुसरी बैठक सर्व साहित्य संस्थांची मातृसंस्था असलेल्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या बाळशास्त्री जांभेकर सभागृहात झाली.चिपळूण शहरापासून जवळ असलेल्या धामणवणे येथील श्रीविठलाई मंदिर परिसरातील 'साद मयूराची' शेतजमिनीच्या बांधावर ८ फेब्रुवारी (रविवार) सकाळी ९ ते सायंकाळी ५.३० या वेळेत हे 'बांधावरचे साहित्य संमेलन' होणार आहे. या संमेलनाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ ललित लेखक, कथाकार प्रा. सुहास बारटक्के भूषविणार आहेत. या संमेलनाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष आणि सातारा येथील ९९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे, विजय जोशी (विजो), कथाकथनकार सुरेश देशपांडे उपस्थित राहाणार आहेत. बैठकीत स्वागताध्यक्ष मोदी यांचे ज्येष्ठ भाषा अभ्यासक अरुण इंगवले यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. बोधचिन्हाची निर्मिती आणि डिझाइन राघव खर्चे यांनी केले असून संकल्पना प्रा. संतोष गोनबरे यांची आहे. मोदी यांच्या हस्ते राघव खर्चे यांचाही सन्मान करण्यात आला.

बैठकीस संमेलनाची आयोजक संस्था महाराष्ट्र साहित्य परिषद चिपळूण शाखा, सहभागी संस्था कोकण मराठी साहित्य परिषद चिपळूण शाखा आणि साहित्य भारती चिपळूण शाखा यांचे प्रतिनिधी तसेच चिपळूणातील साहित्यप्रेमी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.माणूस माती आणि नाती यांचे बंध उलगडणारा हा अनोखा साहित्यिक उपक्रम असून यासाठी प्रवेश मर्यादित असणार आहे. या संमेलनात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या रसिकांनी वीणा परांजपे यांच्याशी (9763281358)येथे संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande