
अमरावती, 19 जानेवारी (हिं.स.) : राज्य सरकारने कृषी पंपांसाठी सोलर सक्तीचे धोरण अवलंबवल्याने तिवसा तालुक्यातील हजारो शेतकरी विद्युत कनेक्शनच्या प्रतीक्षेत आहे. गेल्या ३ वर्षांपासून अनेक शेतकरी शेती पंपांसाठी विद्युत कनेक्शन मिळावे यासाठी विद्युत विभागाच्या चकरा मारत आहे. त्यामुळेच राज्य सरकारने शेतकरी विरोधी कृषी पंपाच्या सोलर सक्ती धोरणाला विरोध करण्यासाठी शुक्रवारी तिवसा येथील शासकीय विश्राम गृहावर तालुक्यातील शेतकऱ्यांची बैठक झाली. ज्यामध्ये येत्या गुरुवारी (ता.२२) रोजी तिवसा तहसीलदार यांना निवेदन देण्यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जनआंदोलन मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोलर पंप कनेक्शन घेणाऱ्या शेतकऱ्यांचे ढगाळ वातावरण, नादुरुस्त सोलर, वन्यप्राण्यांमुळे सोलर प्लेटचे नुकसान होत असल्याने ओलीत होत नाही. तर सोलर पंपाचे मेंन्टनंन्स डोकेदुखी ठरत असल्याने शिरजगांव मोझरी गावातील शेतकऱ्यांनी गाव बैठकीत राज्यपातळीवर जनआंदोलन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने शुक्रवारी शासकीय विश्राम गृह तिवसा येथे २ वाजता शिरजगाव मोझरी येथील शेतकऱ्यांनी बैठकीचेआयोजन केले होते. ज्यामध्ये तालुक्यातील शेकडो शेतकरी उपस्थित होते. गुरुवारी दुपारी २ वाजता तिवसा येथील पेट्रोल पंप चौकात शेतकऱ्यांना एकजूट होण्याचे आवाहन केले आहे. त्याठिकाणाहून शेतकऱ्यांचा जनआंदोलन मोर्चा तिवसा तहसील कार्यालय येथे जाऊन तहसीलदार यांच्यामार्फत जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि ऊर्जामंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोलर सक्ती विरोध आणि शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी विद्युत कनेक्शन देण्याची मागणी करण्यात येणार आहे. यावेळी प्रमोद मेश्राम, महादेव अंबुलकर, प्रकाश मेश्राम, स्वप्नील निस्ताने, भूषण गाठे, प्रशांत कांबळे, शरद, धस्कट यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांची बैठकीमध्ये उपस्थिती होती. ---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी