
अमरावती, 19 जानेवारी (हिं.स.) | भारत सरकारच्या शासन निर्णयाला हरताळ फासून लघु व सूक्ष्म उद्योजकांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या रतन इंडिया ऊर्जा प्रकल्पाच्या धोरणाविरोधात ट्रक चालक-मालक व स्थानिक व्यावसायिक आक्रमक झाले असून अंबाई ब्रिक्स, ट्रान्सपोर्ट असो व चालक मालकांच्या वतीने आजपासून बेमुदत वाहतूक बंद पुकारण्यात आला असून मागण्या पूर्ण होईपर्यंत एकही वाहन येथून राख भरून जाणार नसल्याचा इशारा संतप्त चालक व मालकांनी दिला आहे.
रतन इंडिया ऊर्जा प्रकल्पामधून निर्माण होणारी राख ही भारत सरकारच्या विद्युत मंत्रालय, श्रमशक्ती भवन, नवी दिल्ली यांच्या १५ एप्रिल २०२४ च्या शासन निर्णयानुसार लघु व सूक्ष्म उद्योजकांना केवळ एक रुपया प्रति टन दराने देणे बंधनकारक असताना, प्रत्यक्षात मात्र रतन इंडिया व राख वितरण करणाऱ्या संबंधित कंपनीकडून पन्नास पटीने अधिक दर आकारले जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे स्थानिक ब्रिक्स उद्योग, ट्रान्सपोर्ट व्यावसायिक तसेच ट्रक चालक-मालकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट सुरू असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.
अंबाई लोकल ब्रिक्स व ट्रान्सपोर्ट असोसिएशन यांच्या वतीने अध्यक्ष बलविर चव्हाण यांनी स्पष्ट केले की, भारत सरकारच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी न करता व्यावसायिकांची दिशाभूल केली जात आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही रतन इंडिया व्यवस्थापनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने आता आमरण ठिय्या आंदोलनाशिवाय पर्याय उरलेला नाही, असा इशारा त्यांनी दिला.
या आंदोलनाला राजु चिरडे, मोरेश्वर इंगळे, राम चंदेल, सुरज भैस, उमेश डोईफोडे, धीरज चव्हाण, अजय मोरवाल, सचिन कापडे, सागर अंबाडकर, अंकुश झगडे, किशोर चंद्रकर, विशाल देशमुख, चंदन मोरे यांच्यासह सर्व ट्रक चालक-मालक व स्थानिक व्यावसायिकांचा पाठिंबा आहे. दरम्यान, शासन निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करून एक रुपया प्रति टन प्रमाणे राख उपलब्ध करून न दिल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी