
परभणी, 19 जानेवारी (हिं.स.)।
परभणी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची तारीख अखेर निवडणूक आयोगाने जाहीर केल्याने गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. या पार्श्वभूमीवर सेलू तालुक्यातील पाच जिल्हा परिषद गटांसाठी उमेदवार निश्चितीची प्रक्रिया पूर्ण झाली असून, उमेदवार निवडीत महाविकास आघाडी आघाडीवर ठरल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
सेलू तालुक्यात एकूण पाच जिल्हा परिषद गट आहेत. यामध्ये देऊळगाव गट हा सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव असून या गटातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून सौ. ऊर्मिला नामदेव अप्पा डख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. रवळगाव गट हा ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव असून या गटातून सौ. अर्चना अप्पासाहेब लहाने निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. कूपटा गट हा ओबीसी पुरुष प्रवर्गासाठी राखीव असून या गटातून प्रकाश मुळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. वालूर गट हा सर्वसाधारण पुरुष प्रवर्गासाठी असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून राम खराबे पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर चिकलठाणा गट हा सर्वसाधारण पुरुष प्रवर्गासाठी असून या गटातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुरुषोत्तम पावडे निवडणूक लढवणार आहेत.
या निवडणुकीत महाविकास आघाडीने सर्व पाचही गटांमध्ये मजबूत उमेदवार उभे केल्याने आघाडीने सुरुवातीपासूनच सरशी घेतल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत सेलू तालुक्यातील पाच गटांपैकी एक गट शिवसेनेचा तर चार गट राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी जिंकले होते. यावेळीही एक उमेदवार ‘मशाल’ चिन्हावर तर चार उमेदवार ‘घड्याळ’ या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या रणांगणात महाविकास आघाडीला कितपत यश मिळते, हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, तालुक्यातील राजकीय वर्तुळात एक वेगळीच चर्चा रंगली असून, पाचही जिल्हा परिषद गटांमध्ये सर्वच उमेदवार ‘घड्याळ’ या चिन्हावर निवडणूक लढवू शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. असे झाल्यास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार राम खराबे पाटील हेही ‘मशाल’ऐवजी ‘घड्याळ’ हे चिन्ह हातात बांधतील, अशी चर्चा तालुक्यातील जाणकारांमध्ये सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis