
कोल्हापूर, 19 जानेवारी (हिं.स.) - येथील गुरुवर्य वेदशास्र संपन्न श्री अवधूतशास्री गोविंद बोरगावकर यांचे नुकतेच निधन झाले. गुरुजींनी येथील दत्त मंदिरातील पहाटे काकड आरतीपासून शेजारतीपर्यंतच्या सर्व सेवा निष्ठेने केल्या होत्या. दत्तगुरूंच्या सेवेचा ध्यासच त्यांनी मनाशी बाळगला होता. ऋग्वेदातील वेदमंत्र, संस्कृत, प्राकृत आरत्या, स्तोत्रे, देवाकडे नित्य म्हणण्यात येणारी पदे त्यांना मुखोद्गत होती.
शुद्ध आचार, वेदमंत्रपठनातील स्पष्ट उच्चार, वागण्यात घालून घेतलेली शिस्त, सतत गुरुचरणाकडे सेवा भक्तीची ओढ, अध्ययन आणि अध्यापनाचा घेतलेला ध्यास, नित्य गोसेवा, वृत्ती नम्र, बोलण्यात स्पष्ट आणि परखडपणा, पंचांग विचारण्यासाठी आलेल्या व्यक्तींचे सन्मानयुक्त आदरातित्य करून, त्यांच्या शंकांचे, प्रश्नांचे शास्रानुसार योग्य मार्गदर्शन करण्याची सिद्धी त्यांनी सात्त्विक तपोबळाने प्राप्त केली होती. त्यांच्या या अनेक गुणवैशिष्ट्य पैलूमुळे त्यांना राज्य पातळीवर पुष्कळ पुरस्कार मिळाले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी