
परभणी, 19 जानेवारी (हिं.स.)। मानव सेवा विकास प्रतिष्ठानच्या वतीने स्त्रीशक्ती, मातृत्व आणि कर्तृत्ववान मातांच्या योगदानाला उजाळा देण्यासाठी तीनदिवसीय आई महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात असून दि. २१ ते २३ जानेवारी दरम्यान श्री राजीव गांधी विद्यालय, समाधान नगर, परभणी येथे हा महोत्सव उत्साहात पार पडणार आहे.
या महोत्सवामध्ये समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान मातांचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक दिवशी महाराष्ट्रातील नामवंत कवी, कवयित्री व सुप्रसिद्ध व्याख्याते उपस्थित राहून आईच्या जीवनातील महत्त्व, तिचे संस्कारमूल्य व समाजघडणीतले योगदान यावर मार्गदर्शन करणार आहेत.
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी दि. २१ जानेवारी रोजी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे यांचे “जीवन सुंदर आहे” या प्रेरणादायी विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. या व्याख्यानातून जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा संदेश दिला जाणार आहे.
दि. २२ जानेवारी रोजी छत्रपती संभाजीनगर येथील प्रसिद्ध कवयित्री शांताबाई शिंदे यांच्या काव्यगायनाचा विशेष कार्यक्रम होणार असून आईच्या भावना, त्याग आणि प्रेम यांचे रसपूर्ण दर्शन त्यांच्या कवितांतून घडणार आहे.
महोत्सवाच्या समारोपाच्या दिवशी दि. २३ जानेवारी रोजी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी प्रशांत मोरे यांचा “आई तुझा हात परिसर हा” हा भावस्पर्शी कार्यक्रम सादर होणार आहे. या कार्यक्रमातून आई आणि माणूस यांच्यातील नात्याचा भावनिक पदर उलगडला जाणार आहे.
या तीनदिवसीय आई महोत्सवासाठी दररोज विविध सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. आईच्या कर्तृत्वाला, मातृत्वाच्या मूल्यांना आणि स्त्रीशक्तीच्या सन्मानाला समर्पित असलेला हा महोत्सव परभणीकरांसाठी एक प्रेरणादायी पर्व ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis