परभणी मनपात उबाठा–काँग्रेसची निर्विवाद सत्ता
— पत्रकार परिषदेत आघाडीच्या नेत्यांचा दावा परभणी, 19 जानेवारी (हिं.स.) । परभणी महानगरपालिकेच्या निवडणुकीत जनतेने धनशक्तीवर मात करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेस आघाडीला स्पष्ट बहुमत दिले आहे. त्यामुळे ही आघाडी महापालिकेत निर्विवाद स
अ


— पत्रकार परिषदेत आघाडीच्या नेत्यांचा दावा

परभणी, 19 जानेवारी (हिं.स.) । परभणी महानगरपालिकेच्या निवडणुकीत जनतेने धनशक्तीवर मात करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेस आघाडीला स्पष्ट बहुमत दिले आहे. त्यामुळे ही आघाडी महापालिकेत निर्विवाद सत्ता स्थापन करणार असल्याचा विश्वास दोन्ही पक्षांच्या नेतेमंडळींनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.अक्षदा मंगल कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत खासदार संजय जाधव, आमदार डॉ. राहुल पाटील, काँग्रेसचे माजी आमदार सुरेश देशमुख यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मनपात सत्ता स्थापनेचा अधिकृत दावा केला.

यावेळी खासदार संजय जाधव म्हणाले की, या विजयाचे श्रेय परभणीकर जनतेला जाते. जनतेने महाविकास आघाडीवर भरभरून विश्वास दाखवून स्पष्ट बहुमत दिले आहे. सत्ता स्थापन करून ही आघाडी लोकहितासाठी काम करेल. मात्र राज्य सरकारने परभणी महानगरपालिकेला सवतीची वागणूक देऊ नये. जिल्हा नियोजन समितीत नियमानुसार वाटा देत मनपास अधिक निधी उपलब्ध करून द्यावा. पालकमंत्र्यांनी कटकारस्थान न करता परभणीकर म्हणून शहराच्या विकासासाठी निधी द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. तर आमदार डॉ. राहुल पाटील म्हणाले की, हा जनतेचा कौल धनशक्तीविरोधात जनशक्तीचा विजय आहे आणि त्यामुळेच परिवर्तनाची मशाल पेटली आहे. खासदार संजय जाधव पाच टर्मचे खासदार असून आपण तिसऱ्या टर्मचे आमदार आहोत, त्यामुळे निधी कसा आणायचा हे आम्हाला ठाऊक आहे. शासनाकडे असलेला पैसा हा जनतेचा असून तो कोणाची खासगी मालमत्ता नाही. दुजाभाव न करता शहराच्या विकासासाठी निधी द्यावा, तसेच भाजपने पराभव स्वीकारावा, असे आवाहनही त्यांनी केले.काँग्रेसचे माजी आमदार सुरेश देशमुख म्हणाले की, जनतेने काँग्रेस व शिवसेना (उबाठा) आघाडीला स्पष्ट बहुमत देत सत्ता स्थापनेचा आशीर्वाद दिला आहे. ही सत्ता निर्विवादपणे स्थापन करून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आघाडी कटिबद्ध राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

सत्तेचे सूत्र ठरणार कोणाकडे ?

शिवसेना (उबाठा)–काँग्रेस आघाडीत शिवसेनेला सर्वाधिक 25 जागा मिळाल्या असून काँग्रेसला 12 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे महापौर, उपमहापौर व स्थायी समिती सभापती पदाबाबत दोन्ही पक्षांची नेतेमंडळी संयुक्तपणे निर्णय घेतील. या प्रक्रियेत खासदार संजय जाधव यांची भूमिका महत्त्वाची ठरेल, असे आमदार डॉ. राहुल पाटील यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande