संविधान मूल्यांची जपणूक ही सामूहिक जबाबदारी - साळवे
Preserving-the-
संविधान मूल्यांची जपणूक ही सामूहिक जबाबदारी - साळवे


नाशिक, 19 जानेवारी (हिं.स.)। भारतीय संविधानाने गरीब-श्रीमंत, स्त्री-पुरुष तसेच प्राणी मात्रांपर्यंत सर्वांना संरक्षण दिले असून संविधानातील मूल्यांची जपणूक करणे ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागाचे केंद्र समन्वयक भास्कर साळवे यांनी केले.

भारतीय संविधानास ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ‘घर घर संविधान’ या उपक्रमांतर्गत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाज कल्याण नाशिक विभागाचे प्रादेशिक उपायुक्त माधव वाघ, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त देवीदास नांदगांवकर, विश्वास सोळस, मुकेश कानडे, राजेश गरूड, भूषण शेळके, विद्यार्थी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

श्री. साळवे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत संविधानातील न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुता या मूल्यांचे महत्त्व विशद केले.या अभियानाचा उद्देश नागरिकांमध्ये संविधानिक मूल्यांची जाणीव निर्माण करणे, संविधानिक ज्ञानाचा प्रसार करणे तसेच घराघरात संविधानाबाबत जागरूकता वाढवणे हा आहे. कार्यक्रमात संविधानातील विविध बाबी, मूलभूत अधिकार व कर्तव्ये, केंद्र-राज्य संबंध याविषयी उपस्थित विद्यार्थ्यांनी व अभ्यासकांनी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून संवाद साधला.

या उपक्रमांतर्गत नाशिक जिल्ह्यातील शासकीय वसतिगृहे तसेच शासकीय निवासी शाळांमध्ये संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन, जनजागृती शिबिरे, परिसंवाद, प्रश्नमंजुषा, कार्यशाळा तसेच संविधान सन्मान यांसारखे कार्यक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती उपायुक्त श्री. वाघ यांनी दिली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त नांदगावकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आरती दंडवते यांनी विशेष परिश्रम घेतले.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande