
पुणे, 19 जानेवारी (हिं.स.)पुणे महापालिकेच्या निवडणुका संपल्यानंतर आता साहित्य क्षेत्रातील व्यक्तींना वेध लागले आहेत ते महाराष्ट्रातील आद्य साहित्य संस्था असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीचे. मसापच्या निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू असून, परिषदेच्या 21 जागांसाठी इच्छुकांची तयारी सुरू झाली आहे. परिषदेच्या नवीन घटनेनुसार ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार असून, विविध पदांसाठी सुमारे 170 अर्ज वितरीत झाल्याची माहिती निवडणूक अधिकारी ॲड. प्रताप परदेशी यांनी दिली. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीतील बोगस मतदान टाळण्यासाठी नियमावली तयार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.महाराष्ट्र साहित्य परिषदेची निवडणूक नेहमीच चर्चेचा विषय राहिलेली आहे. त्यामुळे साहित्य क्षेत्रातील प्रत्येकाचे या निवडणुकीकडे लक्ष लागलेले असते. परिषदेच्या घटनेनुसार दर पाच वर्षांनी कार्यकारी मंडळाची निवडणूक होणे बंधनकारक आहे. परिषदेची शेवटची निवडणूक 2016 मध्ये झाली होती. परिषदेची विद्यमान कार्यकारिणी 2016 मध्ये निवडून आल्यानंतर 2021 मध्ये या कार्यकारिणीचा कार्यकाळ संपला. मात्र, कोरोना काळात निवडणूक घेण्यासारखी परिस्थिती नसल्यामुळे या कार्यकारिणीने वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांच्या मतदानाने पाच वर्षांची मुदतवाढ घेतली होती. ती मुदतवाढ 31 मार्च 2026 रोजी संपणार आहे. दहा वर्षांनी परिषदेची निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून, इच्छुकांची तयारी सुरू झाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु