
पुणे, 19 जानेवारी (हिं.स.)। पुणे महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीतील भाजप, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) हे तिन्ही पक्ष स्वबळावर लढल्यानंतर आता पुण्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये महायुतीतील भाजप आणि शिवसेना (शिंदे) यांची युती होण्याची शक्यता असून, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या दोन्ही ‘राष्ट्रवादी’ची आघाडी होणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे पुण्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत महायुतीतील मित्रपक्षांच्या विरोधात अजित पवार असा संघर्ष होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
महापालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना (शिंदे) यांच्यात युतीसाठी बोलणी झाली, मात्र, भाजपच्या स्थानिक नेत्यांनी विरोध केल्याने युती होऊ शकली नाही. मात्र, आता जिल्हा परिषद आाणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये युती करण्याबाबत दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची चर्चेची पहिली फेरी झाली आहे. पुणे जिल्ह्यात या दोन्ही पक्षांची ताकद कमकूवत आहे. दोन्ही ‘राष्ट्रवादी’चे प्राबल्य आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हातात पुणे जिल्हा परिषदेचा कारभार अनेक वर्षांपासून आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेवर सलग दुसऱ्यांदा बहुमत मिळविल्यानंतर भाजपचा आत्मविश्वास दुणावला आहे. आता जिल्ह्याच्या ग्रामीण भागावर कब्जा करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सत्तेवरून पायउतार करण्याची योजना भाजपकडून आखण्यात येत आहे. त्यासाठी त्यांना शिवसेना (शिंदे) पक्षाची गरज भासणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु