सकारात्मक अभिव्यक्तीतून माणूसपण घडते : डॉ. आलोक जत्राटकर
कोल्हापूर, 19 जानेवारी (हिं.स.)।सकारात्मक अभिव्यक्तीमधून माणूसपण घडत जाते आणि मानवतेच्या कक्षा रुंदावतात, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्रातील अ
शिवाजी विद्यापीठात डॉ. अलोक जत्राटकर यांचे व्याख्यान


कोल्हापूर, 19 जानेवारी (हिं.स.)।सकारात्मक अभिव्यक्तीमधून माणूसपण घडत जाते आणि मानवतेच्या कक्षा रुंदावतात, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्रातील अंतर्गत शिक्षकांमध्ये गुणवत्ता व कौशल्यवृद्धीसाठी बातमीलेखन याविषयी डॉ. जत्राटकर यांचे काल (दि. १६) विशेष व्याख्यान झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी केंद्राचे प्रभारी संचालक डॉ. कृष्णा पाटील होते.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये शिक्षकांच्या सर्वांगीण विकासाला, कौशल्याधारित ज्ञानाला विशेष महत्व असल्याने कौशल्य विकास उपक्रमांतर्गत सदर व्याख्यान आयोजित करण्यात आले. डॉ.जत्राटकर म्हणाले, अभिव्यक्ती ही मानव असण्याची पूर्वअट आहे. त्यासाठी भोवतालामधून प्रेरणा घेऊन आपल्या वाचन, लेखन आदी अभिव्यक्तीच्या दिशा शोधाव्या लागतात. अनुभव आणि सातत्य यामधून ही कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे. बातमी लेखन ही एक शैलीदार कला असून हे कौशल्य प्रत्येकाला सरावातून विकसित करता येते. यावेळी त्यांनी संज्ञापन, बातमीलेखन, वार्तामूल्ये, लेखनाचे प्रकार, बहुमाध्यमी बातमीचे स्वरुप इत्यादींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमास उपकुलसचिव विनय शिंदे, समन्वयक डॉ.चांगदेव बंडगर यांच्यासह सर्व समन्वयक, सहायक प्राध्यापक आणि कोर्स कॉर्डिनेटर उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande