
नांदेड, 19 जानेवारी (हिं.स.)।नांदेड महापालिका निवडणुकीपूर्वी काँग्रेससह शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षातून भाजपत गेलेल्या ३२ जणांनी विजयाचा गुलाल उधळला आहे. त्यामुळे विजयाची खात्री असलेल्यांना उमेदवारी हे खासदार अशोकराव चव्हाण यांचे नियोजन यशस्वी झाले आहे. भाजपाने नव्याने पक्षात आलेल्या ४५ जणांना उमेदवारी दिली होती. त्यापैकी ३२ जण विजयी झाले आहेत. तर दुसरीकडे शहर विकास आघाडीचा प्रयोग मात्र फसला.
खासदार अशोकराव चव्हाण यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपात प्रवेश केला होता. त्यावेळी
काँग्रेसमधील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने भाजपात गेले होते, परंतु शहरातील माजी नगरसेवक, पदाधिकारी यांना मात्र वेट अॅन्ड वाँचचा सल्ला देण्यात आला होता. त्यानंतर, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपात काही प्रवेश करून घेण्यात आले. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये प्रवेशासाठी रांगच लागल्याचे चित्र दिसून आले.
खासदार चव्हाण यांनी माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना भाजपात प्रवेश देऊन महापालिकेची उमेदवारीही दिली. त्यात मोजके अपवाद वगळता, बहुतांश जणांनी विजयाचा गुलाल उधळला आहे. त्यात शिला भवरे, राजेश यन्नम, वैशाली देशमुख, सविता गड्डुम, उमेश चव्हाण, प्रियंका संघरत्न कांबळे, वीरेंद्र गाडीवाले, दीपाली मोरे, अनुराधा काळे, सुलोचना काकडे, निरंजना लांडगे, वैजनाथ देशमुख, सुवर्णा बस्वदे, संजय घोगरे, तुलजाराम यादव, प्रभाबाई यादव, मनजीकौर कुंजीवाले, सुमीत मुथा, गुरमितसिंघ नवाब, सरिता बिरकले, शैलजा स्वामी, प्रशांत तिडके, जयश्री पावडे, किशोर स्वामी, बलवंतसिंघ गाडीवाले, सरस्वती राऊत, कविता मुळे, सतीश देशमुख आणि सरिता पवळे यांचा समावेश आहे. भाजपात आलेल्या तब्बल ४५ जणांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यातील १३ जणांचा मात्र पराभव झाला आहे.
यांचा झाला पराभव
संदीप सोनकांबळे, नागेश कोकुलवार, दीपक पाटील, दिनेश मोरताळे आणि सखाराम तुप्पेकर या मंडळींना मात्र निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या उमेदवारांना अपक्ष आणि बंडखोर उमेदवारांचा फटका बसला आहे. तर शहर विकास आघाडीच्या माध्यमातून नशीब आजमावत असलेल्यांच्या पदरीही पराभव आला आहे. त्यामुळे महापालिकेत आघाडीचा प्रयोग फसला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis