
नांदेड, 19 जानेवारी (हिं.स.)महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, नांदेड विभागामार्फत सन २०२६–२७ या प्रथम सत्रासाठी विविध व्यवसायांमध्ये ०१ वर्ष कालावधीसाठी शिकाऊ उमेदवार (Apprentice Trainee) भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ही भरती ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार असून एकूण १५० पदे भरण्यात येणार आहेत. व्यवसायनिहाय पदसंख्या पुढीलप्रमाणे आहे.
मेकॅनिक मोटार व्हेईकल – ५०, मेकॅनिक डिझेल – ५०, शीट मेटल वर्क्स – २०, ऑटो इलेक्ट्रिशियन – ०८, मेकॅनिक रेफ्रिजरेशन अँड एअर कंडीशनर – ०८, पेंटर (जनरल) – ०६, वेल्डर (गॅस अँड इलेक्ट्रिक) – ०४, टर्नर – ०२ तसेच अभियांत्रिकी पदवी/पदविका – ०२ अशी एकूण १५० पदे आहेत. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व दिव्यांग उमेदवारांसाठी शिकाऊ उमेदवार कायद्यानुसार जागा आरक्षित राहतील.
आय.टी.आय. किंवा व्होकेशनल अभ्यासक्रम तसेच ऑटो इंजिनिअरिंग टेक्निशियन अभ्यासक्रम उत्तीर्ण उमेदवारांनी प्रथम www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर स्वतःचे नोंदणीकरण करणे आवश्यक आहे. अभियांत्रिकी पदवी/पदविका उत्तीर्ण उमेदवारांनी www.mhrdnats.gov.in किंवा www.nats.education.gov.in या NATS पोर्टलवर नोंदणी करून MSRTC Division Nanded या आस्थापनेसाठी ऑनलाईन अर्ज करावा.
त्यानंतर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विहित नमुन्यातील छापील अर्ज भरून सादर करणे आवश्यक आहे.
छापील अर्जाची किंमत (जीएसटी सह) खुल्या प्रवर्गासाठी ५९० रुपये असून मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांनी वैध जातीचे प्रमाणपत्र सादर केल्यास २९५ रुपये इतकी राहील. इच्छुक व पात्र उमेदवारांनी विहित मुदतीत अर्ज सादर करण्याचे आवाहन रा.प. महामंडळ नांदेड विभागामार्फत करण्यात आले आहे.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis