
अमरावती, 19 जानेवारी (हिं.स.)शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नसला तरी सोन्या आणि चांदीचे भाव मात्र गगनाला भिडले आहेत. याचा परिणाम लग्नसराईवर झाला असून आपल्या मुलांचे लग्नकरावे तरी कसे असा यक्षप्रश्न शेतकऱ्यांच्या समोर उभा ठाकला असल्याचे ग्रामीण भागात सुरू असलेल्या चर्चेवरून दिसून येत आहे. दिवसेंदिवस पर्यावरणातील बदलामुळे शेतीवर याचा मोठा परिणाम दिसून येत आहे. त्यातच जागतिक स्तरावर होत असलेल्या बदलामुळे देखील मोठे परिणाम दिसून येत आहेत. दिवसेंदिवस वाढत चाललेली महागाई परंतु शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही अशा परिस्थितीमुळे शेतकरी वर्ग गांगरून गेलेला आहे. दरवर्षी पिक जोमाने येईल भाव चांगला मिळेल सरकार मायबाप आपल्या पाठीशी उभा राहील या भाबड्या आशेवर उत्साहाने पुन्हा शेती करणारा शेतकरी यावर्षी पार कोलमडून पडल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांना शेतीमालाला भाव नाही तर तुटपुंजी मदतीचे गाजर देऊन शेतकऱ्यांची बोळवण करण्यात येत असून शेतकऱ्यांच्या पाठीमागील दुःखाची काळी छाया मात्र कोणालाही दिसून येत नाही. यावर्षी अतिवृष्टी आणि महापुरामुळे मोठ्या प्रमाणात शेतजमिनीचे नुकसान होऊन पिके वाहून गेली होती. दुष्काळ व अतिवृष्टीचा तडाका बसल्याने शेतकऱ्यांची बाजू घेऊन मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरलेल्या संघटना आणि शेतकरी नेते मात्र निवडणुका लागताच भूमिगत झाल्याचे दिसून येत आहे. अतिवृष्टीमुळे ओल्या दुष्काळाचे सावट दिसताच सर्वत्र शेतकऱ्यांच्या बाजूने वातावरण निर्मिती होत असल्याचे पाहून शासनाने निवडणुकीचा डाव टाकून अलगदपणे लक्ष वळवले आणि शेतकऱ्यांचा मालाचा भाव वाढविण्यासाठी आणि एकरी ५० हजार रुपये मदत मिळावी या मागण्या व इतर प्रश्न जिथे आहे तिथेच राहिले. शेतीचे उत्पादन तर वाढले पण
शेतकऱ्यांचे उत्पन्न मात्र या प्रचलित व्यवस्थेत वाढू नये अशी व्यवस्थाच सरकारने आधिच करून ठेवली असल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न मात्र वाढले नाही. शेतकरी वर्गाला समजून येऊं नये म्हणून शेतीला इन्कमटॅक्स मधुनच वगळले. कारण त्यांनी शेतीचा हिशोब ठेऊ नये. तसाही शेतकरी शेतीचा हिशोब ठेवत नसल्याने तो केव्हा कर्जबाजारी होत गेला हे त्याचं त्यालाच समजले नाही. देशाचे उत्पादन वाढले पाहिजे या उत्सुकतेपोटी भान विसरून पुढे चालत गेला. तरी त्याचे उत्पन्न वाढलेच नाही. शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नसला तरी सोन्या आणि चांदीचे भाव मात्र गगनाला भिडले आहेत. सोन्या आणि चांदीचे भाव दररोज वाढत असल्याने आता लग्नसराईमध्ये लग्नकार्य कसे पार पाडावे याचा पेच निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. लग्न म्हटले की सोन्या चांदीचे आभूषणे घ्यावेच लागतात. सोन्याचा भाव जवळपास दीड लाखापर्यंत प्रति तोळा पोहोचत आहे. तर सोयाबीनचा भाव प्रतिक्किंटल सरासरी ४ ते ५ हजार रुपये आहे. कितीही कमी खर्चात मुला-मुलींचे लग्न केले तरीही २ ते ३ तोळ्याचे सोन्याचे दागिने करावेच लागतात. तिन तोळे सोन घेतो म्हटलं तर आताच्या घडीला ४ लाख ४५ हजार रुपयांचे वर पैसे मोजावे लागतात. म्हणजे जवळपास १०० ते ११० किंटल सोयाबीनच्या बरोबरीचे पैसे मोजावे लागतात. तर २०० क्विंटल च्या आसपास ज्वारी सद्यस्थितीत दहा ग्राम सोन्याचा भाव १ लाख ४५ हजार रुपये तर चांदी प्रति किलो २ लाख ८२ हजार रुपयापर्यंत पोहोचली आहे. भाव वाढीने सर्वसामान्य जनतेचा बजेट कोलमडला असून सोने-चांदी घेणे आवाक्याचे बाहेर गेले आहे. जागतिक स्तरावर होत असलेले बदल, युद्धाची चर्चा यामुळे भाव वाढ होत असून लग्नात देखील सोने खरेदीवर मर्यादा आल्याचे दिसून येत आहे. गोरगरीब यामुळे मोठ्या चिंतेत असून दरवर्षी किडूकमिडूक करून बचत करणारे यांना देखील याचा फटका बसला आहे. सोने आणि चांदीच्या व्यवसायावर देखील परिणाम झाला असून व्यवसाय मंदावले आहे. जुने घेतलेले सोने कोणीही विक्री करताना दिसत नाही. दररोजच्या भाववाढीचा सुवर्ण व्यवसायिकांना त्रास होत आहे.तर कापूस विकतो म्हटलं तर ५० ते ६० क्विंटल कापूस विकावा लागेल त्यावेळेस लग्नामध्ये ३ तोळे सोन्याचे दागिने बधू करिता घेता येतील. अन्यथा शेती विकल्याशिवाय शेतकऱ्यांसमोर पर्याय नसल्याचे दिसून येत आहे. दरवर्षी शेतीत घाटा येत असल्याने पूर्वीचे जवळ असलेले सोने हे सावकाराकडे गहाण ठेवून वर्षाचा तालमेळ बसविला जात असल्याची परीस्थिती दिसून येत आहे. फक्त दिपवाळीच्या वेळेसच सोने सोडून आणायचे आणि पुन्हा घाण ठेवायचे असंच चक्र वर्षानुवर्षांपसून सुरू आहे. या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याची त्याला संधीच मिळत नसून जोपर्यंत शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही तोपर्यंत हे दृष्टचक्र दिवसेंदिवस बिकट होत जाणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी