
सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांची माहिती
नंदुरबार, 19 जानेवारी (हिं.स.) : समाजाच्या मुख्य प्रवाहात तृतीयपंथी व्यक्तींचा सन्मानपूर्वक व सुरक्षित समावेश व्हावा, यासाठी केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयामार्फत 14427 हा राष्ट्रीय हेल्पलाइन क्रमांक सुरू करण्यात आला असल्याची माहिती समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांनी दिली.ही हेल्पलाइन 24 तास उपलब्ध असून तृतीयपंथी व्यक्तींना त्यांच्या विविध समस्या, तक्रारी तसेच मार्गदर्शनासाठी एक विश्वासार्ह आणि सुरक्षित व्यासपीठ उपलब्ध करून देते.
या हेल्पलाइनद्वारे भेदभाव, छळ किंवा हिंसाचारासंदर्भातील तक्रारी नोंदवता येतात. तसेच आरोग्य सेवा, मानसिक समुपदेशन, उपचार, शिक्षण, शिष्यवृत्ती, कौशल्य प्रशिक्षण, रोजगार व स्वयंरोजगार योजनांची माहिती मिळू शकते. ओळखपत्रे, ट्रान्सजेंडर प्रमाणपत्र तसेच इतर शासकीय सेवांबाबत मार्गदर्शनही या माध्यमातून दिले जाते. याशिवाय निवास व्यवस्था व संरक्षणगृहांची माहितीही उपलब्ध करून दिली जाते.या हेल्पलाइनवर येणाऱ्या सर्व कॉल्सची पूर्ण गोपनीयता राखली जाते. प्रशिक्षित समुपदेशक संवेदनशीलतेने तक्रारी ऐकून घेतात व गरजेनुसार संबंधित विभाग, पोलीस प्रशासन किंवा आरोग्य सेवा यंत्रणांशी समन्वय साधतात, असेही वसावे यांनी स्पष्ट केले.
सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना, शैक्षणिक संस्था तसेच नागरिकांनी या हेल्पलाइनची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. कोणत्याही अडचणीच्या प्रसंगी, अन्याय झाल्यास किंवा मार्गदर्शनासाठी तृतीयपंथी व्यक्तींनी निर्भयपणे 14427 या हेल्पलाइनवर संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांनी केले आहे.
------------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर