
परभणी, 19 जानेवारी (हिं.स.)।
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या स्वयंसहायता समूहामार्फत विविध उद्योग व्यवसाय केले जातात. नवी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी गंगाखेड तालुक्यातील वंदना सुधाकर भोसले आणि मानवत तालुक्यातील भाग्यश्री केशव भिसे या दोन महिलांची निवड करण्यात आली आहे.
देशभरातून २०० सर्वोत्कृष्ट कामगिरी केलेल्या महिला स्वयंसहाय्यता समूह सदस्य व त्यांच्या कुटुंबियांसोबत कर्तव्यपथ, नवी दिल्ली येथे परेड पाहण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. याबद्दल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथूर यांनी महिलांचा गौरव केला आहे. या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याकरिता उमेद अभियानांतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या स्वयंसहाय्यता समूह सदस्य यांची निवड करण्याकरिता त्यांचा समूह हा ए ग्रेडचा असावा, त्यांच्या समुहाने किमान तीम बँक कर्जांची परतफेड केलेली असावी, संबंधित महिला ही लखपतीदीदी असावी आणि संबंधित महिलेच्या समूहातील किमान ५० टक्के महिला यांनी पीएम आवास योजना (ग्रामीण)चा लाभ घेतलेला असावा, असे विविध निकष अपेक्षित होते. या सर्व निकषांच्या आधारे या महिलांची निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातून धुळे, वाशीम, पालघर, सांगली आणि चंद्रपूर या ५ जिल्ह्यांतून देखील प्रती जिल्हा २ महिला आणि त्यांचे कुटुंबीय यांची निवड करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे एकूण ६ जिल्ह्यातील एकूण १२ महिला आणि त्यांचे कुटुंबीय असे एकूण २४ सदस्यांसोबत परभणी जिल्ह्यातून अमर अनिल मुदलियार (जिल्हा व्यवस्थापक, परभणी) आणि अशोक दत्तात्रय सातपुते (तालुका अभियान व्यवस्थापक, जिंतूर) दोन कर्मचारी यांची राज्य समन्वयक म्हणून राज्य अभियान व्यवस्थापन कक्ष, नवी मुंबई यांचेकडून नियुक्ती करण्यात आलेली आहे.
उमेद अभियानातील समूह सदस्यांना 'प्रजासत्ताक दिन सोहळा - २०२६ करीता कर्तव्यपथ, नवी दिल्ली येथे पाठवण्याकरिता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथूर, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा स्मिता पाटील, जिल्हा अभियान व्यवस्थापक, दीपक दहे यांचे मार्गदर्शन लाभले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis