
रत्नागिरी, 19 जानेवारी, (हिं. स.) : सांगलीतील कलाविश्व महाविद्यालयाने लोकरंग भूमी शांतिनिकेतनातर्फे स्व. प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील यांच्या ९४व्या जयंती निमित्त आयोजित 'मल्टीस्टेट रांगोळी स्पर्धेत' देवरूखचे विश्वविक्रमी रांगोळी कलाकार विलास विजय रहाटे प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत.
महाराष्ट्रासह इतर राज्यातील निमंत्रित ४६ स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते. या स्पर्धेसाठी आयोजकांनी वनस्पती व प्राणिशास्त्र या विषयांवर आधारित दृश्यप्रतिमा (वाइल्ड फोटोग्राफी) हा विषय ठेवला होता. श्री. रहाटे यांनी ४ फूट x ६ फूट आकाराची रांगोळी सुमारे २२ तासात साकारून, या प्रतिष्ठित स्पर्धेच्या विजेतेपदाला गवसणी घातली. श्री. रहाटे यांनी आपल्या रांगोळीत शिकार केलेल्या चित्त्याची प्रतिमा आणि त्यासोबत मादी चित्ता पाणवठ्यावर पाणी पिताना आणि तिचे दोन बछडे आपल्या रांगोळीतून साकारले होते. या रांगोळी सोबतची जंगल सुरक्षित आहे, कारण चित्ता सजग आहे ही टॅगलाईइ लक्षवेधी ठरली.
आयोजकांनी श्री. रहाटे यांना विजेतेपदासाठी रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देऊन गौरविले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी