नांदेडमध्ये तब्बल १८ हजार मतदारांना आवडला नाही एकही उमेदवार
नांदेड, 19 जानेवारी (हिं.स.)। नांदेड महानगरपालिकेच्या ८१ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत यंदा राजकीय पक्षांच्या तडाखेबंद प्रचारापेक्षा ''नोटा''च्या आकडेवारीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. रिंगणात ४९१ उमेदवार असूनही तब्बल १८ हजार ८८६ मतदारांनी कोणालाही
नांदेडमध्ये तब्बल १८ हजार मतदारांना आवडला नाही एकही उमेदवार


नांदेड, 19 जानेवारी (हिं.स.)।

नांदेड महानगरपालिकेच्या ८१ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत यंदा राजकीय पक्षांच्या तडाखेबंद प्रचारापेक्षा 'नोटा'च्या आकडेवारीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. रिंगणात ४९१ उमेदवार असूनही तब्बल १८ हजार ८८६ मतदारांनी कोणालाही पसंती न देता 'नोटा'चा पर्याय निवडला. मोठ्या सभा आणि रॅलींनंतरही मतदारांचा हा कौल राजकीय नेत्यांसाठी धोक्याची घंटा मानला जात आहे.

महापालिकेच्या ५ लाख १ हजार ७७ मतदारांपैकी केवळ ६१.७९ टक्के नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यापैकी मोठा हिस्सा 'नोटा'कडे वळणे, हे मतदारांमध्ये वाढत असलेल्या असंतोषाचे स्पष्ट लक्षण आहे. रस्ते, वाहतूक कोंडी, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन आणि वाढीव मालमत्ता कर यांसारख्या मूलभूत सुविधांच्या बाबतीत राजकीय पक्षांनी दाखवलेली अनास्था या निकालातून अधोरेखित झाली आहे.

जरी नोटामुळे कोणत्याही उमेदवाराचा विजय रद्द होत नसला, तरी लोकशाहीतील हा निषेध नोंदवण्याचा एक प्रभावी मार्ग ठरला आहे. विजयी उमेदवारांइतकीच चर्चा आता या नकारची होत असून, मतदारांच्या या मूक आंदोलनाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भविष्यात नोटाकडे आणखी मतदार वळू शकतात.

नांदेड महापालिका निवडणुकीत सिडको प्रभागात सर्वाधिक सदस्य संख्या होती. एकूण २० पैकी १९ प्रभागात प्रत्येकी चार तर प्रभाग क्रमांक २० (सिडको) मध्ये पाच सदस्यांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. यामध्ये १८ हजार ७३४ मतदारांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावला. विशेष म्हणजे तब्बल १ हजार ५९० मतदारांनी नोटा या पर्यायाला मतदान केले. तर सर्वात कमी नोटाला मत हे प्रभाग १५मध्ये ५०८ एवढे झाले.

निवडणूक प्रक्रियेदरम्यान अनेक प्रभागात विद्यमान नगरसेवक पुन्हा मैदानात होते. काही ठिकाणी नातेवाइकांतील राजकीय संघर्ष पाहायला मिळाला, तर काही प्रभागांत अपक्ष उमेदवारांची चुरस रंगली.

मोठ्या संख्येने मतदारांनी नोटाचा वापर करणे, हे उमेदवारांवरील विश्वास डळमळीत झाल्याचे स्पष्ट संकेत देणारे आहे. नोटाला मिळालेली मते ही अनेक उमेदवारांच्या मिळालेल्या मतांपेक्षा अधिक आहेत.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande