अकोला : वाहतूक सुधारण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे कठोर निर्देश
अकोला, 02 जानेवारी (हिं.स.) । अकोला शहरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता, अद्ययावत सिग्नल प्रणाली कार्यान्वित करणे, सिग्नलच्या योग्य वेळा निश्चित करणे आणि अनावश्यक गतिरोधक हटवण्याचे आदेश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी रस्ते सुरक्षा समितीच्या बैठकी
Photo


अकोला, 02 जानेवारी (हिं.स.) । अकोला शहरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता, अद्ययावत सिग्नल प्रणाली कार्यान्वित करणे, सिग्नलच्या योग्य वेळा निश्चित करणे आणि अनावश्यक गतिरोधक हटवण्याचे आदेश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी रस्ते सुरक्षा समितीच्या बैठकीत दिले.

महसूल सभागृहात जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंते प्रसाद पाटील, शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मनोज बहुरे, मनपा शहर अभियंते नीला वंजारी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीत वाहतूक आणि पार्किंग व्यवस्थेचा सखोल आढावा घेण्यात आला. अवैध पार्किंगमुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले. जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी अधिकृत वाहनतळांची पाहणी करण्याचे आणि केवळ त्याच ठिकाणी पार्किंग करण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. तसेच, शिवणी विमानतळासमोरील रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करण्याचे आदेश देखील दिले.

पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी सांगितले की, काही ठिकाणी अनावश्यकपणे लावलेले गतिरोधक अपघातांना कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे अशा गतिरोधकांची तातडीने पाहणी करून आवश्यक ती कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले.

या बैठकीत ठोस निर्णय घेऊन शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पुढील उपाययोजना राबवण्याचे ठरले आहे.

-------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande