
अकोला, 02 जानेवारी (हिं.स.)। उद्योगांच्या विकासासाठी राज्य शासनाकडून अनेकविध प्रकल्प व योजना राबविण्यात येत आहेत. गावोगाव उद्योग निर्माण होण्यासाठी चेंबर ऑफ कॉमर्सच्या ‘गाव तिथे उद्योजक’सारख्या उपक्रमांना निश्चित सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन शालेय शिक्षण, सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी आज अकोल्यात केले.
विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीद्वारे गोरक्षण मैदानावर आयोजित विटेक्स - विदर्भ उद्योग व व्यापार प्रदर्शन 2026 चे प्रदर्शनाचा शुभारंभ राज्यमंत्री डॉ. भोयर यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष रवींद्र माणगावे, सुनील इन्नाणी, शिवप्रकाश रुहाटिया, विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष निकेश गुप्ता, सचिव नीरव वोरा आदी उपस्थित होते.
राज्यमंत्री डॉ. भोयर म्हणाले की, राज्याच्या सर्व भागांत विकास होण्यासाठी पायाभूत सुविधांबरोबरच उद्योगवाढीसाठी प्रोत्साहन शासनाकडून दिले जात आहे. गडचिरोलीसारख्या जिल्ह्यात स्टील उद्योग निर्माण होत आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे उद्योगवाढीसाठी हाती घेतलेल्या उपक्रमांना शासनातर्फे निश्चित सहकार्य केले जाईल.
केंद्र शासनातर्फे क्रेडिट गॅरंटी प्रोग्रामसारख्या योजनांतून व्यापार, उद्योगाला प्रोत्साहन दिले जात आहे. ‘विकसित भारत 2047’चे उद्दिष्ट ठेवून देश प्रगतीकडे वाटचाल करत आहे, असे खासदार श्री. धोत्रे यांनी सांगितले. माणगावे, इन्नाणी, रूहाटिया यांनी मनोगत व्यक्त केले. राहूल मित्तल, पंकज कोठारी, ॲड. सुभाषसिंग ठाकूर, राजकुमार राजपाल, मधुर खंडेलवाल, दीपाली देशपांडे, सलिम दोडिया, चंद्रकांत कोठारी, अशोक दालमिया, मनोज खंडेलवाल आदी उपस्थित होते.
विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीतर्फे ‘विटेक्स 2026’ हे विविध क्षेत्रांतील उत्पादनांचे विक्री प्रदर्शन दि. 2 ते 5 जानेवारी दरम्यान गोरक्षण मैदानावर सकाळी 10 ते रा. 9 या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. त्यात 180 कक्षांचा समावेश असेल.व्यापार व उद्योग क्षेत्रातील नाविन्यपूर्ण बाबींचे सादरीकरण प्रदर्शनातून होणार आहे. सौर ऊर्जा उत्पादने, गृहोपयोगी वस्तू, फर्निचर, भेटवस्तू, घर सजावट साहित्य, फॅशन उत्पादने, ऑटोमोबाईल, कृषी, डाळ गिरणीशी संबंधित यंत्रसामग्री, वित्तसंस्था, कर्जपुरवठा, लेखा सॉफ्टवेअर, करिअर मार्गदर्शन आदी विविध बाबींशी संबंधित उत्पादने, सेवा 180 कक्षांद्वारे उपलब्ध आहेत. अकोलेकरांनी या प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष निकेश गुप्ता, सचिव नीरव वोरा यांनी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे