अकोल्यात 48 तासांत दुसरी हत्या, नवीन वर्षाची सुरुवात हत्येने!
अकोला, 02 जानेवारी (हिं.स.)। अकोला शहरात सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या हत्येनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नववर्षाच्या अवघ्या दोन दिवसांत दोन निर्घृण हत्या झाल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अकोला शहरातील मो
अकोल्यात 48 तासांत दुसरी हत्या, नवीन वर्षाची सुरुवात हत्येने!


अकोला, 02 जानेवारी (हिं.स.)।

अकोला शहरात सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या हत्येनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नववर्षाच्या अवघ्या दोन दिवसांत दोन निर्घृण हत्या झाल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

अकोला शहरातील मोठी उमरी परिसरातील संजय नगर भागात आज सकाळी एक धक्कादायक घटना उघडकीस आली. तीन वर्षांपासून एकत्र राहणाऱ्या पुरुषांच्या जोडप्यातील वादाचा शेवट थेट हत्येत झाला. मृत तरुणाचे नाव अमोल दिगांबर पवार (वय ३५) तर आरोपीचे नाव नितेश अरुण जंजाळ (वय ३८) असल्याचे समजते. मिळालेल्या माहितीनुसार, अमोल आणि नितेश हे गेल्या तीन वर्षांपासून एकत्र राहत होते. मात्र अमोल दुसऱ्या व्यक्तीच्या प्रेमात असल्याच्या संशयावरून दोघांमध्ये सतत वाद होत होते. काल रात्रीही दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. त्यावेळी नितेशने लाठीने अमोलच्या डोक्यावर व तोंडावर जबर मारहाण केली. गंभीर जखमी अवस्थेत अमोलचा जागीच मृत्यू झाला. आज सकाळी नितेश घरातून बाहेर पळत जोरजोरात ओरडत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. अमोल रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसताच नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली.

सिव्हिल लाईन पोलिसांनी अवघ्या अर्ध्या तासात आरोपी नितेश जंजाळ याला ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला असून खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande