
अकोला, 02 जानेवारी (हिं.स.)। राज्यात महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजला असून राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे.. जवळपास सर्वच पक्षात नामांकन अर्ज भरताना मोठी बंडखोरी पाहायला मिळाली. ही बंडखोरी रोखण्यासाठी मोठी कसरत पक्षांना करावी लागली. अकोल्यात ही बंडोबांना थंड करण्यासाठी भाजपसह सर्व पक्षांनी मोठी कसरत केली.. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक मोठ्या घडामोडी अकोल्यात घडल्या.. दोन माजी महापौर यांच्यासह अनेकांनी निवडणुकीतून माघार घेतली..
अकोला महापालिकेच्या २० प्रभागातील ८० जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. या निवडणुकीत भाजप व राष्ट्रवादी अजित पवार गट एकत्र, शिवसेना शिंदे गट स्वबळावर रिंगणात उतरले. शिवसेना ठाकरे गट सुद्धा स्वबळावर मैदानात असून काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार गटात आघाडी झाली आहे. उमेदवारांचे नावे पुढे येताच इच्छुकांमधील नाराजीचा सूर पहायला मिळाला. यावेळी प्रचंड खदखद समोर आली. भाजपने ६२ जागांवर उमेदवार दिले, तर राष्ट्रवादीसाठी १४ जागा सोडल्या. भाजपमध्ये उमेदवारीसाठी तीव्र स्पर्धा होती. काहींना उमेदवारी नाकारल्याने त्यांनी इतर पक्षांचा पर्याय किंवा अपक्ष अर्ज दाखल केले. अपक्ष अर्ज दाखल असलेल्या बंडोबांनी मुदतीत माघार घेण्यासाठी नेतृत्वाकडून प्रयत्न करण्यात आले.
भाजपच्या माजी महापौर सुमनताई गावंडे, काँग्रेसचे माजी महापौर सुरेश पाटील, भाजपचे माजी उपमहापौर राजेंद्र गिरी, माजी नगरसेवक गोपी ठाकरे यांच्यासह इतरांनीही अखेर माघार घेतली. त्यामुळे भाजपला दिलासा मिळाला. माजी राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांचे पुतणे व माजी नगरसेवक आशिष पवित्रकार यांची अपक्ष उमेदवारी मात्र कायम आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या नाराजांनी देखील रिंगणातून माघार घेतली. काँग्रेसमध्ये एक-दोन ठिकाणी बंडखोरी झाली आहे.
८० जागांसाठी एकूण ७७७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. छाननीमध्ये त्यातील ५८ अर्ज बाद ठरले. ७१९ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यातील एकूण १६४ उमेदवारांनी आज माघार घेतल्याचे महापालिका निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले. विभाग क्रमांक एक मधून २४, दोन २५, तीन २६, चार व पाच प्रत्येकी ३२ आणि विभाग सहामधून २५ उमेदवारांनी माघार घेतली आहे. या १६४ उमेदवारांच्या माघारीनंतर आता रिंगणात ५५५ उमेदवार राहिले आहेत. माघारीनंतर राजकीय समीकरण स्पष्ट झाले असून बहुतांश ठिकाणी तिरंगी तर कुठे चौरंगी लढत पाहायला मिळत आहे..
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे