
लातूर, 02 जानेवारी (हिं.स.)। स्वामी विवेकानंद विद्यालय, लातूर येथील इयत्ता ९ वी मध्ये शिकणारा विद्यार्थी आगलावे अनिरुद्ध महारुद्र याची दिव्यांग माध्यमिक गटातून पासवर्ड प्रोटेक्टेड स्मार्ट डोअर लॉक युझिंग सेन्सॉर या प्रकल्पासाठी राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.
शिक्षण विभाग माध्यमिक, जिल्हा परिषद लातूर आणि क्राईस्ट इंटरनॅशनल स्कूल अहमदपूर यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ रोजी क्राईस्ट इंटरनॅशनल स्कूल, अहमदपूर जि. लातूर येथे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनात अनिरुद्ध याने पासवर्ड प्रोटेकटेड स्मार्ट डोअर लॉक युझिंग सेन्सॉर या प्रकल्पाचे सादरीकरण केले होते. अनिरुद्धने हे यश विद्यालयातील अटल टिंकरिंग लॅबच्या माध्यमातून संपादन केले. दिव्यांग माध्यमिक गटातून लातूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवण्याचा मान त्याने पटकावला आहे. या जिल्हास्तरीय प्रदर्शनात जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून एकूण १२० प्रकल्प सादर झाले होते. त्यापैकी अनिरुद्धच्या प्रकल्पाची राज्यस्तरीय निवड झाली आहे. या प्रकल्पासाठी विद्यालयातील विज्ञान शिक्षक अफसर शेख तसेच अटल लॅब प्रमुख ज्योतिराम तवर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis