
परभणी, 02 जानेवारी (हिं.स.)। दिव्यांग व्यक्ती अधिनियम २०१६ अंतर्गत दिव्यांगांना समान संधी व हक्क मिळावेत यासाठी कौशल्य विकास प्रशिक्षणात प्रशिक्षण संस्थांना प्रत्येक बॅचमध्ये किमान ५ टक्के दिव्यांग उमेदवारांचा समावेश बंधनकारक करण्यात आला आहे. या प्रशिक्षणातून दिव्यांगांना रोजगारक्षम बनविण्याचा उद्देश असून जिल्ह्यातील अधिकाधिक दिव्यांग उमेदवारांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीमध्ये दिव्यांग बांधव, दिव्यांगासाठी काम करणाऱ्या विविध संस्था, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी यांनी रोजगाराची मागणी करण्यात आली होती. कौशल्य विभागाने प्रस्ताव मंजूरीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला होता. जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी यामध्ये 5 टक्के दिव्यांग उमेदवारांना घेणे बंधनकारक करावे अशी प्रस्तावात दुरूस्ती करण्याचे आदेश दिले. त्यानंतरच सदरील प्रस्तावाला जिल्हाधिकारी यांनी मंजूरी दिली.
पंतप्रधान यांच्या 'स्किल इंडिया या संकल्पनेस अनुसरुन महाराष्ट्र राज्याने कुशल महाराष्ट्र रोजगारयुक्त महाराष्ट्र हे ध्येय समोर ठेवले असून राज्यातील युवक युवतीचे कौशल्य विकासाव्दारे सक्षमीकरण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत सुशिक्षीत बेरोजगारांसाठी प्रमोद महाजन कौशल्य विकास अभियानाअंतर्गत रोजगाराभिमुख अभ्यासक्रमाचे कौशल्य विकास प्रशिक्षण राबविण्यात येत आहे.
त्याचधर्तीवर जिल्ह्यात प्रमोद महाजन कौशल्य विकास अभियानाअंतर्गत किमान कौशल्य विकास कार्यक्रम जिल्हास्तरीय योजनेमध्ये मानवत, सोनपेठ व जिंतूर तालुक्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि परभणी तालुक्यातील नेक्सस स्किल अकॅडमी, ब्राम्हणगाव व गुरुकृपा स्किल डेव्हलपमेंट सेंटर, कारेगाव तसेच जिंतूर शहरातील श्री कॉम्पुटर, सेलू शहरातील मातोश्री स्किल, गंगाखेड शहरातील आयजीएम कॉम्पुटर एज्युकेशन इत्यादी प्रशिक्षण संस्थामध्ये प्रोसेसड फुड इंटरप्रेनर, फिल्ड टेक्नीशियन कम्पुटींग अॅण्ड पेरीफेरल, सोलार एलईडी टेक्नीशियन, आय टी हेल्प अटेंडन्ट, अॅप्लीकेशन डेव्हलपर वेब मोबाईल, ज्युनिअर सॉफ्टवेअर डेव्हलपर, डीजीटल मित्रा, सोलार पी. व्ही इन्स्टॉलर, ग्राफीक डीझायनर, हॅन्डहेल्ड डिवाईस टेक्नीशिअन, गेस्ट सर्वीस एक्झकेटिव्ह, टेलरींग, फॅशन डिझायनर, रिटेल सेल्स एक्झीकेटीव्ह या अभ्यासक्रमामध्ये 1 हजार 50 उमेदवाराचे कौशल्य विकास प्रशिक्षण राबविण्यात येणार असून त्यापैकी 150 उमेदवाराचे कौशल्य विकास प्रशिक्षण सुरु झालेले आहे. या योजनेसाठी सन 2025-26 अतर्गत रक्कम रु. 01 कोटी 62 लक्ष रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis