
लातूर, 02 जानेवारी (हिं.स.)। महाराष्ट्र गट- ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 रविवार, 4 जानेवारी, 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 12 वाजेपर्यंत एक सत्रामध्ये परीक्षा आयोजित करण्यात आलेली आहे. लातूर जिल्ह्यातील 27 उपकेंद्रावर ही परीक्षा आयोजित केलेली असून परीक्षा कालावधीमध्ये परीक्षा केंद्राच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर परीक्षार्थी येणार आहेत. त्यामुळे परीक्षा कालावधीत परीक्षा कालावधीत परीक्षा केंद्रावर व परिसरात गर्दीमुळे कोणताही अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, यासाठी भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये या परीक्षा केंद्राच्या 100 मीटरच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत.
परीक्षा केंद्राच्या परिसरात प्रवेश करतेवेळी परिक्षार्थी व्यतिरिक्त पाचपेक्षा जास्त व्यक्ती एकत्रितरित्या प्रवेश करणार नाहीत. कोणत्याही प्रकारच्या घोषणा देण्यात येणार नाहीत. परीक्षा केंद्राच्या परिसरात परीक्षार्थी अथवा अन्य व्यक्तीकडून शांततेस बाधा निर्माण होईल, असे कृत्य करण्यात येणार नाही. 100 मीटरच्या परिसरातील झेरॉक्स सेंटर्स, पानटपरी, टायपींग सेंटर, एसटीडी बुथ, ध्वनिक्षेपक इत्यादी माध्यमे आदेशाची मुदत संपेपर्यत बंद राहतील. परीक्षा केंद्राच्या परिसरात मोबाईल फोन, सेल्युलर फोन, ई-मेल व इतर प्रसारमाध्यमे घेवून प्रवेश करण्यास मनाई असेल. कोणत्याही व्यक्तीकडून परीक्षा सुरळीतपणे शांततेच्या वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी कोणतीही बाधा उत्पन्न करण्यात येणार नाही. परीक्षा केंद्रावर कोणत्याही व्यक्तीस अथवा वाहनास प्रवेश मनाई राहील. हे आदेश परीक्षा केंद्रावर काम करणारे अधिकारी, कर्मचारी परीक्षार्थी केंद्रावर निगराणी करणारे अधिकारी व पोलीस अधिकारी,कर्मचारी यांच्याबाबत त्यांच्या परीक्षासंबंधी कर्तव्ये पार पाडण्याच्या अनुषंगाने लागू राहणार नाहीत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis